करोनामुळे नवी दिल्लीमधील परिस्थिती दिवसोंदिवस अधिक चिंताजनक होत चालली आहे. दिल्लीतील परिस्थितीचा अंदाज याच गोष्टीवरुन येऊ शकतो की येथील स्माशानभूमींमध्ये रोज शेकडो व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जात आहे. दिल्लीतील स्मशानभूमींबाहेर अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचेही चित्र दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात अत्यंस्कार केले जात आहेत की आता या स्मशानभूमींच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सततच्या धुरामुळे श्वास घेण्यास अडथळा येत असल्याचं सांगत स्वत:ची जीव वाचवण्यासाठी घरं सोडली आहेत.

नवी दिल्लीतील सीमापुरी स्मशानभूमीला लागून असलेल्या सनराइज कॉलीनीमधील परिस्थिती इतकी भयंकर आहे की येथील अनेक लोकांनी आपल्या घरांना टाळं लावून दुसरीकडे रहायला जाण्याचा निर्णय घेतलाय. स्मशानभूमीमध्ये सतत जळणाऱ्या चितांमुळे या परिसरामध्ये सतत धूर निर्माण होत असतो. या धुराचा कॉलीनीमध्ये राहणाऱ्या वयस्कर व्यक्तींबरोबरच मुलांना आणि सर्वांनाच त्रास होऊ लागला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की पूर्ण कुटुंब दुसरीकडे जाण्याचा पर्याय नसणाऱ्यांनी घरातील वयस्कर व्यक्तींना आणि लहान मुलांना आपल्या नातेवाईकांच्या घरी पाठवलं आहे. कॉलीनीमधील घरांच्या छप्परांवर राखेचे थर दिसून येत असल्याचं झी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

येथील स्मशानभूमीवर सीएनजीवर चालणारी यंत्रणा का बसवली जात नाही असा प्रश्न स्थानिक विचारत आहे. ज्यावेळी या स्मशानभूमीमध्ये करोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा येथील स्थानिकांचा विचार का करण्यात आला नाही, असे प्रश्न आता येथील लोक विचारु लागले आहे. येथील स्मशानभूमीमध्ये विद्यृतदाहीनी किंवा सीएनजीवर चालणारी यंत्रणा नसल्याने लाकड्यांच्या चिता रचून त्यावर अंत्यस्कार केले जात असल्याने येथे खूप धूर होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केलीय. एक चिता जळण्यासाठी सात ते आठ तास लागतात. या हिशोबाने येते २४ तास चिता जळत असल्याचं स्थानिक सांगतात.

या स्मशानभूमीवर रोज शेकडोच्या संख्येने मृतदेह आणले जात आहेत. ही स्मशानभूमी सनराइझ कॉलीनीला अगदी लागून आहे. स्मशानभूमीममध्ये सतत अंत्यसंस्कार सुरु असल्याने या परिसरामध्ये खूप उष्णता निर्माण होऊ लागली आहे. घरात साधा पंखा सुरु केला तरी बाहेरील धूर आत येतो असं स्थानिक सांगतात. या धुरामुळे आता श्वास घेण्यासही त्रास होऊ लागलाय. या संकटामुळे येथील काहीजण घराला टाळा लावून आपल्या गावी निघून गेलेत तर काही इतर ठिकाणी राहायला गेलेत. स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अंत्यसंस्कारांमुळे आम्हाला घरं सोडावी लागतील असं कधी वाटलं नव्हतं, असं मत येथील स्थानिकांनी नोंदवलं आहे.

धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होण्याबरोबरच डोळ्यांची जळजळ होण्याची समस्याही निर्माण झाल्याचं स्थानिक सांगतात. येथील गल्ली क्रमांक १० ते १५ मधील घरं स्मशानभूमीला लागू आहेत. या घरांमधील अनेकांनी टाळं लावून कुटुंबाच्या आरोग्यासाठी दुसरीकडे रहायला जाण्याचा निर्णय घेतलाय.