ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. २०२० पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.
ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. हिंदुस्थान टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.
वेगवेगळया चाचण्यांनंतर फिलीपाईन्सच्या लष्कराने ब्रह्मोस विकत घेण्याचे सुनिश्चित केले आहे. आता फक्त किंमतीवरुन चर्चा सुरु आहे. या संरक्षण व्यवहारासाठी भारताने फिलीपाईन्सला १० कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे. पण फिलीपाईन्स स्वत:च्या पैशाने हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा विचार करत आहे. त्यासाठी पुढच्यावर्षीच्या अर्थसंकल्पात ब्रह्मोसच्या खरेदीसाठी तरतूद करण्याचा फिलीपाईन्सचा विचार आहे. भारतीय लष्कर आणि नौदलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर सुरु केला आहे.
कसे आहे ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र
ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे. ब्रह्मोसचा पल्ला २९० किमी असून त्यावर ३०० किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे बसवता येतात. ब्रह्मोस सध्या जगातील सर्वात वेगवान आणि अचूक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा २.८ ते ३ पट आहे.
म्हणजे ब्रह्मोस एका सेकंदात १ किमी अंतर पार करते. तसेच त्याची नेम चुकण्याची क्षमता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) १ मीटरपेक्षा कमी असल्याचा दावा केला जातो. म्हणजेच त्याची अचूकता ९९.९९ टक्के आहे. क्रूझ क्षेपणास्त्र असल्याने ब्रह्मोस जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते. तसेच मार्ग बदलून क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांपासून बचाव करून घेऊ शकते. ब्रह्मोस जमीन, पाणी तसेच हवेतून डागता येते. भारताच्या तिन्ही सेनादलांत आणि रशियाच्या सैन्यात ब्रह्मोस तैनात केले जात आहे.