राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुफान फटकेबाजी केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचाही त्यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतला. राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळत मोदी म्हणाले,”काँग्रेसचा एक नेता म्हणाला की, ‘सहा महिन्यांत तरुण मोदींना दांड्यांनी मारणार.’ असं असलं तरी मी सहा महिन्यात सूर्यनमस्कार करून स्वतः दंडाप्रुफ करून घेईल,” असं सांगत मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करताना सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. त्याचबरोबर विरोधकांनाही शेलक्या शब्दात टोले लगावले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सुरु असून, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा झाली होती. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘तरुण-तरुणी सहा महिन्यांत दांड्यांनी मारतील’ असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याला मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिलं.

आणखी वाचा – …तर देशातले तरुण पंतप्रधान मोदींना धडा शिकवतील-राहुल गांधी

मोदी म्हणाले,”तरुण मोदींना दांड्यांनी मारतील,’ असं काल एक काँग्रेस नेता म्हणाल्याचं मी ऐकलं. हे काम थोड अवघड आहे. त्यासाठी सहा महिने तयारी करावी लागेल. त्यामुळे पुढील सहा महिन्यात सूर्यनमस्कारांची संख्या वाढवण्याचं मी सुद्धा असं ठरवलं आहे. गेल्या २० वर्षात असभ्य भाषा आणि शिव्यांनी स्वतःला गालीप्रुफ करून घेतलं आहे. आता सहा महिन्यात अशी मेहनत करणार की, माझ्या पाठीला प्रत्येक दांड्याचा वार सहन करण्याची ताकद मिळेल,” असा टोला मोदींनी लगावला.

आणखी वाचा – … तर आजही राम मंदिराचा वाद सुरूच असता; पंतप्रधान मोदींचं काँग्रेसवर शरसंधान

आणखी काय म्हणाले मोदी?

लोकांनी केवळ सरकार बदलली नाही, तर देशात बदल होण्याचीही अपेक्षा ठेवली. नव्या विचारानं काम करण्याची देशाची इच्छा आणि अपेक्षा आहे. त्यामुळेच आम्हाला इथं येऊन काम करण्याची संधी मिळाली आहे.

आम्हीही तुमच्याच रस्त्यानं चालत राहिलो असतो, तर ७० वर्षानंतरही ३७० कलम हटवलं गेलं नसतं. तुमच्याप्रमाणेच काम केलं असतं, तर मुस्लीम महिलांना आजही तिहेरी तलाकची भिती वाटत राहिली असती.

राम जन्मभूमीवरून आजही वाद सुरूच असता. कतारपूर साहिब कॉरिडॉरही झाला नसता. तुमच्याच मार्गानं चालत राहिलो असतो, तर भारत-बांगलादेश वाद कधीच सुटला नसता.