करोना परिस्थिती हाताळण्याबाबत उत्तरप्रदेश सरकार उत्तम कामगिरी करत आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी सरकारचं भरभरुन कौतुक केलं. योगी सरकारच्या योजना कशा जनतेच्या कल्याणासाठीच्या आहेत याबद्दलही पंतप्रधान बोलले. मात्र, यावरुन आता विरोधकांच्या हातात टीकेसाठी आयतं कोलीत मिळालं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी याच मुद्द्यावरुन आता योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी करोना परिस्थिती उत्तमपणे हाताळल्याबद्दल योगी सरकारचं कौतुकही केलं. यावरुन आपल्या ट्विटमधून प्रियंका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.


त्या म्हणाल्या, नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून करोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना योगी सरकारचं क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था ही लपून राहत नाही. आपल्या ट्विटमध्ये त्या पुढे म्हणतात, लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं, असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदी हे सत्य विसरू शकतात. पण ज्यांनी करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे ते कधीच विसरू शकणार नाही.

हेही वाचा – करोना नियंत्रणाबद्दल पंतप्रधानांनी केलं योगी सरकारचं कौतुक

कालच्या आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थिती हाताळण्याबाबत उत्तरप्रदेश सरकारचं कौतुक केलं होतं. ते म्हणाले होते की, करोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तरप्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. मी काशीमधल्या माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, करोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतो. तुम्ही ज्याप्रमाणे दिवस-रात्र झटून व्यवस्था निर्माण केली आहे, ही खूप मोठी सेवा आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संकटं आली. करोना विषाणूच्या बदलणाऱ्या आणि अधिक घातक रुपाने संपूर्ण ताकदीने आपल्यावर हल्ला चढवला. मात्र, काशीसहित संपूर्ण उत्तरप्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला.