बिहारमधील निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. “बिहार सर्वात खास आहे. बिहारमध्ये सत्य जिंकलं आहे, बिहारमध्ये विश्वास जिंकला आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचं भाजपाकडून सेलिब्रेशन करण्यात आलं. दिल्लीमधील कार्यालयात सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यकर्त्यांना तुफान गर्दी केली. यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित आहेत. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून १२५ जागांवर विजय मिळाला आहे.

महान देशातील महान जनतेचे आभार व्यक्त करत असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं. “निवडणुकीत यश दिलं फक्त यासाठी नाही तर लोकशाहीचा उत्सव साजरा केला याबद्दल मी आभार मानत असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. काल सकाळपासून ते रात्रीपर्यंत सर्वांच्या नजरा टीव्ही आणि ट्विटरवर होत्या. लोकशाहीबद्दल भारतीयांचा जो विश्वास आहे तो जगात कुठेही पहायला मिळत नाही. विजय, पराभव आपल्या जागी आहे पण निवडणूक प्रक्रिया सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे,” असं मोदींनी यावेळी सांगितलं.

“आधी बिहारमध्ये निवडणूक झाली की किती मतदारसंघ लुटले, किती ठिकाणी पुन्हा मतमोजणी होणार अशा बातम्या येत असत. पण आता मतदान किती वाढलं अशा बातम्या येतात. एकाही मतदान केंद्रावर पुन्हा मतमोजणी झालेली नाही ही देशाची ताकद आहे. ही निवडणूक करणं सोप्पं नव्हतं. पण आपण जगाला भारताची ताकद दाखवली आहे,” असं मोदींनी यावेळी म्हटलं. नरेंद्र मोदींनी यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना विजयाचं श्रेय देत ‘जे पी नड्डाजी आगे बढो, हम आपके साथ है’ अशी घोषणाही दिली.

“जो निकाल आला आहे त्याचा मोठा अर्थ आहे. लोकसभा निवडणुकीत जे निकाल आले होते त्याचा हा व्यापक विस्तार आहे. भाजपा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे ज्याचा झेंडा संपूर्ण देशवासियांनी देशभर फडकावला आहे. कधी काळी आपण दोन जागांवर होतो. दोन खोल्यांमधून पक्ष चालवला जात होता. आज भारताच्या प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. प्रत्येकाच्या ह्रदयात आपण पोहोचलो आहोत. याचं उत्तर कालच्या निकालाने दिलं आहे,” असं मोदींनी यावेळी सांगितलं.

“देशाच्या विकासाचं काम करेलं त्यालाच सेवा करण्याची संधी मिळेल हे देशवासियांनी सांगितलं आहे. इतर राजकीय पक्षांनाही देशहिताचं काम करण्याचा संदेश दिला आहे. विकास हाच मुख्य मुद्दा आहे,” असंही मोदींनी म्हटलं. “देशाचा आणि राज्याचा विकास हाच निवडणुकीचा मुख्य आधार असून भविष्यातही राहणार आहे. ज्या लोकांना अद्यापही हे कळलं नाही त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे,” असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे.

“भाजपा, एनडीएने देश, लोकांच्या विकासाला मुख्य ध्येय ठरवलं आहे. देशहिताची प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आणि प्रत्येक निर्णय घेणार,” असा निर्धार नरेंद्र मोदींनी यावेली व्यक्त केला. “भाजपा एकमेव पक्ष आहे जो प्रत्येकाची गरज समजून त्यांच्यासाठी काम करत आहे. देशातील तरुणांचाही भाजपावर जास्त विश्वास आहे. दलित-शोषित यांचा आवाजही भाजपाच आहे. मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र कोणी प्रयत्न करत असेल तर तो भाजपा आहे,” असं मोदींनी यावेळी सांगितलं.

“मोदी एवढं बोलत आहेत पण बिहारवर बोलत नाही असं सगळे म्हणत असतील. बिहार सर्वात खास आहे. जर तुम्ही मला बिहारमधील निकालाबद्दल विचारलंत तर माझं उत्तरही निकालाप्रमाणे साफ आहे. बिहारमधील यशाचं रहस्य सांगायचं झालं तर हा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राचा विजय झाला आहे. बिहारमध्ये सत्य जिंकलं आहे, बिहारमध्ये विश्वास जिंकला आहे. तरुण, गरीब जिंकला आहे, शेतकरी जिंकला आहे.. अपेक्षांचा विजय झाला आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

“मी कालपासून बातम्यांमध्ये सायलेंट व्होटरसंबंधी वाचत आहे. भाजपाला सायलेंट व्होटर मतदान करत आहेत असं सांगितलं जात आहे. वारंवार त्यांचा उल्लेख केला जात आहे. देशातील नारी शक्ती याच आमच्या सायलेंट व्होटर आहेत. ग्रामीण ते शहरापर्यंत महिला मतदार भाजपाचे सायलेंट व्होटर ठरले आहेत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. देशातील तरुणांनी पुढे येऊन भाजपाच्या माध्यमातून देशसेवा करावी असं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केलं.

“जे लोक आमचा सामना करत नाही त्यांना नवा मार्ग अवलंबला आहे. देशात भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचं सत्र सुरु आहे. देशातील काही ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. आपले मनसुबे पूर्ण करतील असं त्यांना वाटत आहे. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मला इशारा देण्याची गरज नाही कारण ते काम जनता करेल. विजय पराभव होत असतो पण लोकशाहीत हे चालणार नाही. मृत्यूचा खेळ खेळून मत मिळणार नाही,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.