सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला असून देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरुन नाही”.

“सुधारित नागरिकत्व कायदा दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर झाला आहे. अनेक राजकीय पक्ष आणि खासदारांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. स्वीकृती, सुसंवाद, करुणा आणि बंधुता ही भारताची अनेक दशकांपासून चालत असलेली जुनी परंपरा असून हा कायदा तेच दर्शवतो,” असंही मोदींनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “या कायद्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिक किंवा धर्माला धक्का लागणार नाही असं मी सर्व भारतीयांना आश्वासन देतो. कोणत्याही भारतीयाला या कायद्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. हा कायदा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी गेली कित्येक वर्ष बाहेर छळ सहन केला असून त्यांच्याकडे भारताशिवाय इतर कोणताही पर्याय नाही”.

“भारताच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे. आपल्यात फूट पाडणं तसंच गोंधळ निर्माण करण्याची परवानगी आपण देऊ शकत नाही,” असंही नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. शांतता, एकता आणि बंधुता राखण्याची ही वेळ आहे असं सांगताना अफवांपासून आपण सर्वांनी दूर राहिलं पाहिजे असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं आहे.