पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लडाखसंबंधी वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही टीका करताना पंतप्रधानांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं आहे. आपल्या शब्दांचा वापर चीनला भारताचं समर्थन म्हणून वापरण्याची संधी पंतप्रधानांनी देऊ नये असंही ते म्हणाले आहेत. नियंत्रण रेषेवरील समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पर्याय वापरावेत तसंच ते चिघळू नयेत यासाठीही प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मनमोहन सिंग यांनी सांगितलं आहे.

लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. मनमोहन सिंग यांनी जवानांनी देशासाठी दिलेलं हे बलिदान असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये असंही म्हटलं आहे. “आपल्या सरकारने घेतलेले निर्णय आणि कृतींवरुन भविष्यातील पिढी आपल्याला ओळखणार आहे. जे नेतृत्त्व करत आहेत त्यांच्यावर खांद्यावर कर्तव्य निभावण्याची मोठी जबाबदारी आहे. आणि आपल्या लोकशाहीत ही जबाबदारी पंतप्रधानांवर असते,” असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं आहे.

“देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलताना पंतप्रधानांनी शब्द वापरताना नेहमी काळजी घेतली पाहिजे. कारण याचा परिणाम आपल्या रणनीती आणि प्रादेशिक हितांवरही होत असतो,” असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं आहे. मनमोहन सिंग यांनी यावेळी चीनला आक्रमकपणा दाखवण्यावरुन आणि भारतीय जमिनीचा ताबा घेण्यावरुन फटकारलं आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही तसंच प्रादेशिक अखंडतेशी कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- “सॅटेलाइट फोटोत चीनने आपल्या जमिनीचा ताबा घेतल्याचं स्पष्ट दिसतंय”; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या शब्दांचा वापर चीनला आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी करु देऊ शकत नाही असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. यावेळी संपूर्ण देशाने एकत्र येऊन चीनला उत्तर देण्याची गरज असल्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत, असं विधान सर्वपक्षीय बैठकीत केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून टीका करत आहेत.