देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाचा देशभरात उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी गेल्या दीड वर्षापासून देशात ठाण मांडून बसलेल्या करोनाविषयी आणि त्याला देशवासीयांनी दिलेल्या उत्तराचं देखील पंतप्रधानांनी कौतुक केलं. यावेळी त्यांनी देशातील आरोग्य क्षेत्राचं, तसेच संशोधकांचं देखील कौतुक केलं. तसेच, भारताला लसीसाठी इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहावं लागत नाही, हे प्रतिपादन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये केलं आहे.

“जर आपल्याकडे स्वत:ची लस नसती तर…”

करोना काळात भारतात होत असलेल्या विक्रमी लसीकरण मोहिमेविषयी देखील पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. “मानवतेसमोर करोनाचा हा काळ खूप मोठ्या आव्हानाचा आहे. भारतीयांमध्ये खूप संयम आणि धैर्य आहे. या लढ्यामध्ये आपल्यासमोर अनेक आव्हानं होती. पण प्रत्येक क्षेत्रात आपण देशवासीयांनी असामान्य वेगाने काम केलं. आपल्या वैज्ञानिकांच्या ताकदीचा परिणाम आहे, की भारताला लसीसाठी इतर कोणत्या देशावर अवलंबून राहावं लागलं नाही. तुम्ही कल्पना करा की जर भारताकडे स्वत:ची लस नसती, तर काय झालं असतं? पोलिओची लस मिळवण्यात आपले किती वर्ष निघून गेले. एवढ्या संकटात जगात महामारी असताना आपल्याला लस कधी मिळाली असती? पण आज गर्वाने सांगता येतंय की जगातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे. ५४ कोटींपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. कोविनसारखी ऑनलाईन व्यवस्था आज जगाला आकर्षित करत आहे. या संकटात भारत ज्या पद्धतीने ८० कोटी देशवासीयांना महिन्याचं धान्य दिलं, हा देखील जगभरात चर्चेचा विषय आहे”, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

 

प्रत्येक भारतीयाला भावूक करणारं ‘हम हिंदुस्तानी’ गाणं, बिग बींसह १४ दिग्गजांचा सुरेल नजराणा

“करोनाच्या संकटामध्ये आपले डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी, लस बनवणारे आपले संशोधक, करोडो देशवासीय, ज्यांनी करोनाच्या काळात प्रत्येक क्षण जनसेवेत दिला, ते देखील आपल्या सगळ्यांच्या वंदनाचे अधिकारी आहेत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.