करोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेचं चक्रही पूर्णपणे थांबलं आहे. भारतात गुरुवारी करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ८० हजारांच्या जवळ गेल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे भारत पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेचं थांबलेलं चक्र सुरू करण्याची तयारी करत आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. “करोनाची लढाई सर्वांनी एकत्र मिळून लढली पाहिजे,” असं मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करोनाच्या लढाईतील समस्या आणि या आजाराशी लढण्याच्या उपाययोजना यावर चर्चा केली. तसंच यावेळी मोदी यांनी करोनाविरोधात भारतानं केलेल्या उपाययोजनांचीही बिल गेट्स यांना माहिती दिली. “भारत आपल्या सर्व नागरिकांच्या मदतीनं करोनाविरोधातील ही लढाई कठोरपणे लढत आहे. करोनाशी निगडित सर्व माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. याचा लाभ जगभरातील अन्य देशही घेऊ शकतात. अशा कठीण परिस्थितीत कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे,” असं मोदी म्हणाले.

गेट्स फाऊंडेशनचाही उल्लेख

“स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छतेबाबत पहिल्यापासूनच जागरूक केलं जात होतं. करोना व्हायरसच्या लढाईत ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. करोनाविरोधातील लढाईत गेट्स फाऊंडेशन भारतासोबतच जगभरातील निरनिराळ्या भागांमध्ये मदत पोहोचवत आहे, हे खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे,” असंही मोदी म्हणाले.

Story img Loader