मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांच्या मृत्यू झाल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे ट्विट करुन सांगितले आहे.  या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांना अनेक नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबईमधील आगीची बातमी धक्कादायक आहे. ज्यांनी या आगीत जीव गमावला आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच जे यामध्ये जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो अशी इच्छा व्यक्त करतो अशा आशयाचे ट्विट राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाऊंण्टवरून ट्विट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या अग्नितांडवात जीवाची पर्वा न करता आगीत अडकलेल्यांची सुखरुप सुटका करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांची आणि बचावकार्यात सहभागी असणाऱ्या पोलिस दलातील जवांनाच्या धाडसाची राष्ट्रपतींने प्रशंसा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पंतप्रधान या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरून मोदींची प्रतिक्रिया ट्विट करण्यात आली आहे. मुंबईतील आगीची बातमी पाहून व्याकूळ झालो. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. तसेच जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होवो अशी इच्छा व्यक्त करतो असे ट्विट पीएमओच्या अकाऊण्टवरून करण्यात आले आहे.

कमला मिलमधील आगीच्या सखोल चौकशीचे आदेश मुंबई माहानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे. तसेच या ट्विटमध्ये मृत्यांना श्रद्धांजली वाहताना फडणवीस यांनी मुंबईत कमला मिलमधील आगीत जीवितहानी झाल्याच्या घटनेमुळे दु:ख झाले आहे. ज्यांनी आपल्या जवळचे लोक गामावले आहेत माझी सहानभूती त्यांच्याबरोबर आहे. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो असे म्हटले आहे.