पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी रात्री उशिरा ‘यूएनजीए’च्या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित केलं. “७५ वर्षांपूर्वीच्या युद्धाच्या भीतीमुळे एक नवीन आशा निर्माण झाली. मानवी इतिहासामध्ये प्रथमच संपूर्ण जगासाठी एक संस्था निर्माण केली गेली. संयुक्त राष्ट्र चार्टरचा संस्थापक स्वाक्षरीकर्ता म्हणून भारत त्या महान दृष्टीकोनाचा एक भाग होता,” असं मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं.

“जगाला एक कुटुंब म्हणून पाहणार्‍या भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ याचेच हे प्रतिबिंब आहे. संयुक्त राष्ट्रामुळेच आज जग अधिक योग्य स्थितीत आहे. शांतता आणि विकासासाठी काम केलेल्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या ध्वजाखाली शांतता कार्यात योगदान देणार्‍या सर्वांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. भारताने यात अग्रणी म्हणून योगदान दिलं,” असं मोदी यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- “जे दहशतवाद्यांना शहीद म्हणतात…”; काश्मीर मुद्द्यावरुन UN मध्ये भारतानं पाकिस्तानला सुनावलं

“आज आम्ही ज्या योजनांवर काम करत आहोत, त्या स्वीकारल्या जात आहे. परंतु संघर्ष थांबवणं, विकास करणं, हवामान बदल, असमानता कमी करणं आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासारख्या मुद्द्यांवर आपल्याला अधिक काम करण्याची आवश्यकता आहे. या घोषणा आणि कृतींनुसार स्वत: संयुक्त राष्ट्र संघटनेत सुधारणा करण्याचीही आवश्यकता आहे. जुन्या सरचनांसह आपण आजच्या आव्हानांना तोंड देऊ शकत नाही. सर्वसमावेशक सुधारणांशिवाय संयुक्त राष्ट्रासमोर विश्वासाचं संकट उभं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.