नव्या कृषी कायद्यांविरोधात पाच दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने अखेर आज दुपारी चर्चेसाठी बोलावलं आहे. तर, नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. शिवाय, मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी असल्याचेही संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरून उतरून विचार करा आणि शेतकऱ्यांचा अधिकार द्या ” असं त्यांनी म्हटलं आहे.

एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे पंतप्रधान मोदी विविध कार्यक्रमांना ऑनलाइन उपस्थिती लावत असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.

“अन्नदाते रस्त्यांवर- मैदानांवर धरणे आंदोलन करत आहेत आणि ‘खोटं’ टीव्हीवर भाषण! शेतकऱ्यांच्या कष्टाचं आपल्या सर्वांवर कर्ज आहे. हे कर्ज त्यांना न्याय व हक्क दिल्यानंतरच फिटेल. त्यांना झिडकारून, काठ्यांनी मारहाण करून आणि त्यांच्यावर अश्रूधारांच्या नळकांड्या फोडून नाही. जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरून उतरून विचार करा आणि शेतकऱ्यांचा अधिकार द्या” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.”

शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून काँग्रेसकडून सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे.

राहुल गांधी म्हणतात, “अब होगी किसान की बात…”

“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन दिलं होतं, मोदी सरकारने उत्पन्न तर अनेक पटीने वाढवलं मात्र अदानी-अंबानीचं. जे काळ्या कृषी कायद्यास आतापर्यंत बरोबर म्हणत आहेत. ते काय शेतकऱ्यांच्या हितादृष्टीने तोडगा काढतील? अब होगी किसान की बात…”असं राहुल गांधी यांनी या अगोदर ट्विटद्वारे म्हटलं होतं.

नाव शेतकरी कायदा, संपूर्ण फायदा मात्र अब्जाधीश मित्रांचा – प्रियंका गांधी

तर, “नाव शेतकरी कायदा मात्र संपूर्ण फायदा अब्जाधीश मित्रांचा. शेतकरी कायदा शेतकऱ्यांशी चर्चा न करता कसा बनू शकतो? त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताकडे कसे दुर्लक्ष केले जाऊ शकते? सरकारला शेतकऱ्यांचे म्हणने ऐकावे लागेल. या सर्वजन मिळून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवू ” असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलेलं आहे.