देशातील करोना रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लाखाच्या जवळपास लोक दिवसाला करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या वाढण्याचा वेगही झपाट्यानं वाढत आहे. देशातील करोनाच्या वाढत्या प्रसारावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “अनियोजित लॉकडाउन ही एका अंहकारी व्यक्तीची देणं आहे. ज्यामुळे करोना देशभरात पसरला,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी देशात करोनाचा शिरकाव होण्याआधीपासूनच सरकारला लक्ष्य करत आहे. करोनाच्या धोक्याविषयीही त्यांनी फेब्रुवारीमध्येच इशारा दिला होता. त्यानंतर ते सातत्यानं व्हिडीओ आणि ट्विटच्या माध्यमातून प्रश्न विचारून मोदी सरकारला घेरण्याचा प्रश्न विचारत आहेत.

आणखी वाचा- Corona Impact: भारताचा GDP तब्बल नऊ टक्क्यांनी घटणार – एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जचा अंदाज

देशातील करोनाच्या वाढत्या प्रसारावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून, मोदींना लक्ष्य केलं आहे. “करोनाची रुग्णसंख्या या आठवड्यात ५० लाख आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १० लाखांच्या पुढे जाईल. अनियोजित लॉकडाउन एका व्यक्तीच्या अंहकाराची देण आहे, ज्यामुळे करोना देशभर पसरला. मोदी सरकारनं आत्मनिर्भर व्हा असं सांगितलं आहे. म्हणजेच स्वतःचा जीव स्वतःच वाचवा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.

आणखी वाचा- करोनाचा कहर सुरूच; रुग्णांची संख्या ४८ लाखांच्या पुढे, बळींचा आकडाही धक्कादायक

देशातील करोना स्थिती कशी?

देशात मागील २४ तासांत (१४ सप्टेंबर) देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले, तर एक हजार १३६ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या राज्यांना करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ इतकी झाली आहे. यामध्ये ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७९ हजार ७२२ जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. भारतातील करोनामुक्त रुग्णांचं प्रमाण ७७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ जणांनी करोनावर मात केली आहे.