लॉकडाउननंतर स्थलांतरित मजुरांचा प्रश्न चर्चेत आला. मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यावरून राजकारण सुरू झालं. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापुढे राज्यातून मजूर नेण्यापूर्वी सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असं विधान केलं होतं. त्यावरून महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. याच मुद्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर दिलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन देशातील परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी राहुल गांधी म्हणाले,”संपूर्ण जगात लॉकडाउन उठवला जात असताना करोना रुग्णांची संख्या घटत आहे. तर दुसरीकडे भारतातील रुग्णसंख्या वाढत आहे. गरिबांसाठी व शेतकऱ्यांसाठी सरकार काय करत आहे, याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवं,” असं राहुल गांधी म्हणाले.

आणखी वाचा- महाराष्ट्रात सरकारला समर्थन, पण मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही – राहुल गांधी

मजुरांच्या मुद्यावरून सुरू झालेल्या वादावर बोलताना राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समाचार घेतला. “आमचा विश्वास उडाला असल्याचं देशातील मजूर म्हणत आहेत. हे असं कुणीही म्हणायला नको. देशात कुणाचाही विश्वास संपायला नको. केंद्र सरकार आजही मजुरांना मदत देऊ शकते. प्रत्येक मजुराच्या खात्यात ७५०० जमा करु शकते. त्याचबरोबर मजूर कुणाचीही वैयक्तिक संपत्ती नाही. ते कुठेही जाऊन काम करू शकतात. त्यांना कुणीही रोखू शकत नाही,” असं उत्तर राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना दिलं.

आणखी वाचा- “उत्तर प्रदेशमध्ये १० लाख करोनाग्रस्त?”; योगींच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन प्रियंका यांचा सवाल

काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातील उपाययोजनांबद्दलही राहुल गांधी यांनी माहिती दिली. “काँग्रेस शासित राज्यामध्ये आम्ही गरिबांना पैसा देत आहे. त्यांना जेवण दिलं जात आहे. आम्हाला माहिती आहे की, पुढे काय करायचं आहे. पण, राज्य कुठपर्यंत एकटेच लढाई करणार? केंद्र सरकारलाही समोर यावं लागेल व पुढील उपाययोजनांविषयी देशाला माहिती द्यावी लागेल,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Story img Loader