देशात दिवसेंदिवस करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज लाखांच्या घरात नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून करोना संसर्गाला आळा घालण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असून, कडक निर्बंध देखील लागू करण्यात आलेले आहे. शिवाय, केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाय योजनांसंदर्भात माध्यमांद्वारे माहिती देखील दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केंद्र सरकारकडे एक विनंती केली आहे.

“केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती आहे की ‘पीआर’ व अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्या ऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे संकट आणखी गंभीर होईल, याला तोंड देण्यासाठी देशाला तयार करायला हवं. सध्याची दुर्दशा असहनीय आहे.”

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या अगोदर राहुल गांधींनी केंद्र सरकारवर अनेकदा निशाणा साधलेला आहे. “कोविड संकट, चाचण्या नाही, लस नाही, ऑक्सिजन नाही, आयसीयू नाही… प्राथमिकता!” असं त्यांनी ट्विट केलं होतं.

तसेच, “करोनामुळे ऑक्सिजनचा स्तर घसरू होऊ शकतो, मात्र ऑक्सिजनचा तुटवडा आणि आयसीएयू बेडची कमतरतेमुळे अनेक मृत्यू होत आहे. भारत सरकार ही जबाबदारी तुमची आहे.” असं देखील राहुल गांधी म्हणाले होते.

करोना संसर्गाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी देशाच्या माजी पंतप्रधानांपर्यंत सर्वच अडकत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील करोनाची लागण झालेली आहे.

“घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत…”; राहुल गांधींनी केलं ट्विट

“घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ करोनाचं नाही, केंद्र सरकारचे जनतेविरोधातील धोरण आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या.” असं देखील राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे.