काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी कृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एक ट्विटर पोल सुरु केला आहे. नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भातली चर्चा ३५ दिवसांपासून सुरु असल्याने त्यांनी हा पोल सुरु केला आहे. मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत ही शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र मोदी सरकारने यावर अद्याप चर्चांच्या फेऱ्या वगळता काहीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता ट्विटर पोल करुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी जो ट्विटर पोल केला आहे तो काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचं हित न पाहणारे काळे कायदे रद्द करत नाहीत कारण…. असा प्रश्न विचारत त्यांनी चार पर्याय दिले आहेत.
काय आहेत हे चार पर्याय?
पर्याय पहिला – मोदी शेतकरी विरोधी आहेत
पर्याय दुसरा – मोदींना क्रोनी कॅपिटालिस्ट चालवत आहेत
पर्याय तिसरा – पंतप्रधान नरेंद्र मोदी हट्ट सोडू शकत नाहीत
पर्याय चौथा – उपरोक्त सर्व पर्याय

असं म्हणत राहुल गांधी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. मागील चार तासांपासून हा पोल ट्विटरवर आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी आपलं मत नोंदवलं आहे. ट्विटरवर या पोलची चांगलीच चर्चा रंगली आहे. २४ तासांसाठी त्यांनी हा पोल त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सुरु केला आहे.

मागील ३५ दिवसांपासून केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. पंजाब आणि हरयाणातले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र आंदोलन मागे घेण्यात आलेलं नाही. आता याच आंदोलनावरुन राहुल गांधी यांनी ट्विटर पोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.