तामिळ चित्रपट ‘मर्सल’वरुन वाद तापलेला असताना सुपरस्टार रजनीकांत यांनी ‘मर्सल’ला पाठिंबा दर्शवला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि रजनीकांत यांची जवळीक वाढत असल्याची चर्चा होती. मात्र आता रजनीकांत यांनी थेट ‘मर्सल’चे समर्थन केले आहे. या चित्रपटात जीएसटीवर भाष्य करण्यात आल्याने भाजपने या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.
अभिनेता विजयचा ‘मर्सल’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. विजयच्या या चित्रपटाची तामिळनाडूत जोरदार चर्चा आहे. मात्र या चित्रपटात वस्तू आणि सेवा कर, डिजिटल इंडियावर टीका करण्यात आल्याने भाजपने चित्रपटावर जोरदार आक्षेप घेतला. ‘चित्रपटातील काही दृश्ये जीएसटी आणि डिजिटल इंडियाविषयी गैरसमज निर्माण करु शकतात. त्यामुळे ती दृश्ये वगळण्यात यावी,’ अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष टी. एन. सौंदरराजन यांनी केली होती. मात्र या चित्रपटाचे रजनीकांत यांनी कौतुक केले. ‘महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य… उत्तम… मर्सल टीमचे अभिनंदन’, असे ट्विट त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत आणि भाजपच्या जवळीकीची मोठी चर्चा होती. मात्र आता रजनीकांत यांनी ‘मर्सल’ला पाठिंबा दर्शवत ‘भाजप’विरोधात भूमिका घेतली आहे.
Important topic addressed… Well done !!! Congratulations team #Mersal
— Rajinikanth (@rajinikanth) October 22, 2017
रजनीकांत यांच्याआधी अनेक सेलिब्रिटींनी मर्सलचे समर्थन केले आहे. या चित्रपटात जीएसटी आणि डिजिटल इंडियावर भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळेच भाजपने या दृश्यांना कात्री लावण्याची मागणी केली होती. याशिवाय भाजप नेते एच. राजा यांनी विजयच्या धर्मावरुन या वादाला जातीय रंग दिला. तर भाजपचा विरोध म्हणजे मतभिन्नता आणि विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया विजयच्या चाहत्यांनी व्यक्त केली. याआधी अभिनेते कमल हसन यांनीही या वादावर भाष्य केले. ‘मर्सलला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा सेन्सॉर करण्याची गरज आहे. टीकेला तथ्यांच्या आधारे उत्तर द्यायला हवे. टीकाकरांचा आवाज दडपू नका,’ असे ट्विट कमल हसन यांनी केले होते.
कोणत्या दृश्यांवर भाजपचा आक्षेप?
चित्रपटातील दोन दृश्यांवर भाजपला आक्षेप आहे. यातील पहिल्या दृश्यात एक पाकिटमार चित्रपटातील नायक अर्थात विजयच्या खिशातील पाकिट चोरतो. पण डिजिटल इंडियामुळे पाकिटात पैसे नाही, असे या दृश्यात म्हटले आहे. तर दुसऱ्या दृश्यात नायकाने सिंगापूर आणि भारतातील जीएसटीची तुलना केली आहे. सिंगापूरमध्ये ७ टक्के जीएसटी असून तिथे लोकांना मोफत उपचार मिळतात. पण भारतात २८ टक्के जीएसटी भरुनही लोकांना मोफत उपचार मिळत नाही, असे नायक म्हणतो.