मत द्यायचे नाही तर देऊ नका परंतु चप्पलफेक करू नका असे वक्तव्य केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्यावर एकेठिकाणी चप्पलफेक करण्यात आली होती. त्याचा संदर्भ घेऊन ते बोलत होते. ज्या नेत्याने पंजाबच्या सेवेत आपले आयुष्य वेचले त्याचा असा अनादर करू नका असे ते म्हणाले.

पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी सभा घेतली. अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली. शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षाची येथे युती आहे. पुन्हा पंजाबमध्ये या दोन्ही पक्षांचीच सत्ता स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पंजाब हा ड्रग्जच्या विळख्यात अडकला आहे. पंजाबमध्ये पाकिस्तानातून ड्रग्ज येतात. जर कुणी भारतामध्ये ड्रग्ज पाठवण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे असा इशारा दिला. पंजाबमध्ये पाकिस्तानमधून गेल्या कित्येक वर्षांपासून ड्रग्ज येत आहेत. या व्यवसायात हजारो कोटींची उलाढाल होते. पाकिस्तानने आता आमच्याकडे चुकूनही वाकड्या नजरेनी पाहू नये असे त्यांनी म्हटले.

आम्ही केवळ भारतीय भूमीवरच लढू शकतो असे नव्हे तर गरज पडल्यास आम्ही सीमेपलीकडेही लढू शकतो असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. याआधी आम्ही ते सिद्ध केले असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. भारताने सर्जिकल स्ट्राइक करुन सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. त्याचा संदर्भ देऊन ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे सरकार हे स्वच्छ असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या अडीच वर्षांमध्ये आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसल्याचे ते म्हणाले.