कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित सर्व सत्रांसाठी सोमवारी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे राज्यसभेत सोमवारीही गदारोळ झाला. त्यामुळे कामकाजाविना सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. दोन दिवसांमधील राज्यसभेत घडलेल्या घडामोडींमुळे व्यथित होऊन राज्यसभेचे उपसाभपती हरिवंश यांनी एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

उपासभापती हरिवंश यांनी पत्रात म्हटले आहे की, “२० सप्टेंबर २०२० रोजी राज्यसभेत जे काही झाले, त्यामुळे मागील दोन दिवसांपासू मी अतिशय मानसिक तणावात आहे. मी रात्रभर झोपू देखील शकलो नाही. माझ्या समोर २० सप्टेंबर रोजी उच्च सभागृहात जे काही घडले, त्यामुळे सभागृहाच्या मर्यादेचे मोठे नुकसान झाले आहे. सभागृहात सदस्यांकडून लोकशाहीच्या नावाखाली हिंसक कृत्य झाले. या ठिकाणी बसलेल्या सदस्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न झाला. उच्च सभागृहाची मर्यादा आणि व्यवस्थेचे उल्लंघन करण्यात आले.”

आणखी वाचा- आठ निलंबित खासदारांचं संसद परिसरात रात्रभर धरणे आंदोलन

तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, डोला सेन, काँग्रेसचे राजीव सातव, रिपन बोरा, नझीर हुसेन, माकपचे के. के. रागेश, इलामारन करीम आणि आपचे संजय सिंह यांच्या निलंबनाचा ठराव सोमवारी राज्यसभेत मांडण्यात आला. तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

आणखी वाचा- “संसदेत गुंडागर्दी करणाऱ्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी नवीन कायदा करा”

शेतीविषयक दोन विधेयके प्रवर समितीकडे पाठवण्यासंदर्भातील विरोधकांचा ठराव राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी मतविभाजन न घेता आवाजी मतदानाने फेटाळून लावला. त्यामुळे संतापलेल्या विरोधी सदस्यांनी रविवारी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. आठ विरोधी सदस्यांच्या या गरवर्तनाची दखल घेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी कारवाई केली.