नवी दिल्ली : गुजरात कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांनी बुधवारी दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.

अस्थाना हे येथील जयसिंह मार्गावरील दिल्ली पोलीस मुख्यालयात पोहोचले, त्या वेळी त्यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

‘दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून मी आज पदभार स्वीकारला. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे रोखणे या पोलीस सेवेच्या प्राथमिक संकल्पनांवर माझा विश्वास असून आम्ही त्याच करणे अपेक्षित आहे. या गोष्टी योग्य रीतीने करण्यात आल्यास समाजात शांतता नांदेल’, असे अस्थाना यांनी पत्रकारांना सांगितले.

सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून काम पाहणारे राकेश अस्थाना हे तत्काळ प्रभावाने दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी रुजू होतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात सांगितले. अस्थाना हे ३१ जुलैला निवृत्त होणार असताना काही दिवसांपूर्वी ही नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ १ वर्षांचा राहणार आहे.

अस्थाना यांनी यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष संचालक म्हणून काम पाहिले आहे. सीबीआयचे तत्कालीन संचालक आलोक वर्मा यांच्याशी त्यांचा अप्रिय असा वाद होऊन दोघांनीही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.