देशात करोनाची दुसरी लाट सुरु असताना दिल्लीत म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचं सावट गडद झालं आहे. गेल्या काही दिवसात राजधानी दिल्लीत ब्लॅक फंगसची अनेक प्रकरणं समोर आली आहे. त्यात दोन रुग्णांना दुर्मिळ ब्लॅक फंगसची लागण झाल्याने डॉक्टरही चिंतातूर झाले आहेत. या परिस्थितीवर डॉक्टर नजर ठेवून आहेत.

दिल्लीत ५६ वर्षीय आणि ६८ वर्षीय व्यक्तीला दुर्मिळ ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. या दोघांनाही मधुमेह आहे. तर एका रुग्णाला करोना उपचारादरम्यान स्टेरॉइड दिले होते. सुरुवातीला त्यांच्या पोटात दुखत होतं. मात्र काही केल्या बरं वाटत नसल्याने अखेर डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यात दोघांच्या छोट्या आतड्यांना छीद्र पडल्याचं दिसून आलं आहे. हा दुर्मिळ ब्लॅक फंगसचा प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे तातडीने उपचार सुरु केले आहेत.

दिल्लीतील ५६ वर्षीय व्यक्तीने करोनामुळे पत्नी आणि कुटुंबातील दोन सदस्यांना गमावलं आहे. इतकं होऊनही त्यांनी दु:खातून सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही करोनाची लागण झाली होती. सुरुवातीला साधी लक्षणं असल्याने त्यांनी अपचनावरील औषधं घेतली. तरीही बरं वाटत नसल्याने शेवटी त्यांचं सीटी स्कॅन करण्यात आलं. त्यात त्यांच्या छोट्या आतड्यामध्ये छीद्र पडल्याचं दिसून आलं. ६८ वर्षीय व्यक्तीच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. करोनातून बरे झाल्यानंतर ते घरी परतले होते. मात्र पोट दुखीमुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सीटी स्कॅन केलं. तेव्हा त्यांच्याही छोट्या आतड्याला छीद्र असल्याचं दिसून आलं. दोन्ही रुग्णांच्या आतड्यांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

“म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठीच्या औषधाची उपलब्धता आणि पुरवठा वाढवला”, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

५ कंपन्यांना औषध बनवण्याची परवानगी
देशात आता करोनानंतर ब्लॅक फंगसची दहशत पसरली आहे. त्यात ब्लॅक फंगसच्या उपचरासाठी असलेल्या औषधांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे खडबडून जागं झालेल्या सरकारने ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी लागणारी औषधं तयार करण्यासाठी ५ कंपन्यांना परवाना दिला आहे.