जगाच्या तुलनेत भारतात करोना संसर्गाचा वेग मंदावला आहे असं वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने जे प्रयत्न केले आणि तातडीने जी पावलं उचलली त्याचा हा परिणाम आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. करोनाचे जास्त रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्र, ओदिशा, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि नवी दिल्लीमध्ये झाले. असं सगळं असलं तरीही जगाचा विचार केला तर भारतात संसर्गाचा वेग मंदावला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी लोकसभेत बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी हे वक्तव्य केलं.

देशात करोना बाधितांची संख्या दररोज वाढते आहे. करोना लशीच्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी ३ ते ९ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशा स्थितीत फास्ट ट्रॅक व्हॅक्सिन आणण्याचा विचार सुरु आहे असंही हर्षवर्धन यांनी सांगितलं. मागील २४ तासांमध्ये ७७ हजार ५१२ लोक देशात करोनामुक्त झाले आहेत. देशात करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७८ टक्के झाला आहे अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली. तसंच इतर देशांच्या तुलनेत भारतात करोना संसर्ग होण्याच प्रमाण कमी झालं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारने केलेला लॉकडाउन आणि वेळेवर केलेल्या उपाय योजना यामुळे आपण करोना संसर्ग रोखू शकलो असंही त्यांनी म्हटलं आहे.