दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना सकाळी 9.30 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आपल्या निवासस्थानातून काम न करण्याचा सल्ला देच संसदेच्या अधिवेशनादरम्यान कोणताही दौरा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वत:च्या कार्यशैलीचे उदाहरण दिले. जेव्हा आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतो त्यावेळी अधिकाऱ्यांबरोबर वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी यावेळी आपल्या मंत्र्यांना निवडून आलेल्या खासदारांच्या भेटी घेण्यासही सांगितले. तसेच पुढील पाच वर्षांचा अजेंडा तयार करून कामाची सुरूवात करावी आणि याचा प्रभाव पुढील 100 दिवसांमध्ये दिसला पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

या बैठकीत मार्च 2019 च्या उच्च शिक्षण संस्थांच्या आरक्षण ऑर्डिनंसला रिप्लेस करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. याद्वारे आता 7 हजार शिक्षकांची भरती करण्यात येऊ शकते. तसेच शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यावरही अधिक भर देण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. यामुळे शिक्षकांच्या केडरमध्ये 200 पॉइंट रोस्टरसह थेट भर्ती करून 7 हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती करणे तसेच एससी, एसटी, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाच्या जुन्या मागण्या पूर्ण होणार आहेत. तसेच यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठीही 10 टक्के आरक्षण निश्चित केले जाणार आहे.