राज्यांकडे पुरेसा साठा असल्याचा मंत्र्यांचा दावा

केंद्राकडून राज्यांना होणारा  विषाणूरोधक रेमडेसिविर या औषधाचा पुरवठा आता केंद्राने थांबवला आहे. कारण राज्यांकडे पुरेसा साठा असल्याने आता केंद्राकडून पुरवठ्याची गरज नाही, असे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले.

ते म्हणाले, की आता देशातही रेमडेसिविरचा पुरेसा साठा आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आम्ही राज्यांना रेमडेसिविरचा पुरवठा थांबवत आहोत.

रस़ायने व खते मंत्री मांडविय यांनी म्हटले आहे, की कोविड १९ मध्ये वापरल्या जाणाऱ्या या औषधाचा पुरवठा आधी मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात म्हणजे किमान दहा पटींनी वाढवण्यात आला होता. ११ एप्रिलला हा पुरवठा ३३ हजार कुप्यांचा होता, सध्या रोज ३ लाख ५० हजार कुप्यांचा झाला. सरकारने रेमडेसिविर उत्पादन करण्यासाठी काही महिन्यांतच २० ते ६० प्रकल्प उभारले आहेत. सरकारने आपत्कालीन साठ्यासाठी पन्नास लाख कुप्यांची खरेदी केली होती. पण आता राज्यांकडेही पुरेसा साठा आहे. त्यामुळे केंद्राकडून पुरवठ्याची गरज नाही. सरकारने रेमडेसिविर या औषधावरचे अबकारी शुल्क माफ केले आहे. या इंजेक्शनची किंमतही सरकारने कमी केली आहे. ११ एप्रिलच्या सुमारास रेमडेसिविरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. अनेक  कंपन्यांनीही रेमडेसिविरच्या किमती कमी केल्या होत्या कारण  सरकारने हस्तक्षेप केला होता.

कोव्हॅक्सिनमधील घटकांची भारतात निर्मिती 

हैदराबाद : राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन इम्युनॉलॉजिकल्स या कंपनीने कोविड १९ प्रतिबंधक लशीसाठी लागणाऱ्या औषधी घटकाचे उत्पादन १५ जूनपासून करण्याचा निर्णय़ घेतला आहे. या औषधी घटकाचा पहिला टप्पा भारत बायोटेक या लस निर्मात्या कंपनीला १५ जून रोजी दिला जाणार आहे. आयआयएलएसचे संचालक के. आनंद कुमार यांनी सांगितले, की २० ते ३० लाख मात्रांसाठी लागणारे औषधी घटक आम्ही तयार करणार असून यावर्षी ७० लाख व नंतर १.५ कोटी मात्रांसाठी लागणारे औषधी घटक तयार करण्यात येणार आहेत. कोविड प्रतिबंधक लस निर्मितीला प्राधान्य दिले जात असून त्यासाठी भारत बायोटेकशी भागीदारी करण्यात आली आहे. तंत्रज्ञान हस्तांतर प्रक्रिया वेगाने सुरू  आहे.  आयआयएलएसकडे निष्क्रिय विषाणूपासून लस उत्पादन करण्याची क्षमताही आहे.