उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोयडा येथील ‘पाकिस्तानवाली गली’ या वसाहतीच्या रहिवाशांनी वसाहतीचं नाव बदलण्याची विनंती केली आहे. वसाहतीच्या नावामुळे शासनाने पुरविलेल्या मुलभूत सुविधांचाही लाभ घेता येत नाही असं येथील नागरीकांचं म्हणणं आहे. परिणामी, येथील रहिवाशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे वसाहतीचं नाव बदलण्याची विनंती केली आहे.

‘देशाच्या विभाजनानंतर पाकिस्तानातून आलेले काही लोक येथे स्थायीक झाले, त्यानंतर या परिसराला ‘पाकिस्तान वाली गली’ असं नाव पडलं. पण आमचे पूर्वज पाकिस्तानातून आले त्यामध्ये आमची चूक नाहीये. आम्ही भारतीय आहोत. आमचे केवळ चार पूर्वज पाकिस्तानातून आले होते. पण अद्यापही आमच्या आधार कार्डवर पाकिस्तानवाली गली असं लिहिलं आहे. आम्ही या देशाचाच एक भाग आहोत, तर मग पाकिस्तानच्या नावाखाली आम्हाला विभक्त करण्याचा प्रयत्न का होतो’, अशी खंत येथील एका रहिवाशाने व्यक्त केली. तर, ‘आधार कार्ड दाखवून देखील आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत. आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतोय पण भविष्यात त्यांनाही नोकऱ्या मिळणार नाहीत. काय करायचं हा विचार सारखा मनात येत असतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वसाहतीचं नाव बदलवावं आणि आम्हाला नोकऱ्या उपलब्ध करुन द्याव्यात’ अशी मागणी येथील रहिवासी भूपेश कुमार यांनी केली आहे.

आम्ही दुसऱ्या देशातून आल्याप्रमाणे येथील नागरीक आमच्याशी वाईट वागतात, आम्हाला मोदींकडून अपेक्षा आहेत. त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचला तर ते नक्कीच काहीतरी पावलं उचलतील अशी अपेक्षा अन्य एका नागरीकाने व्यक्त केली. या वसाहतीत 60 ते 70 घरं असून सरकारने त्यांच्या वसाहतीचं नाव बदलावं अशी त्यांनी विनंती केली आहे.

 

Story img Loader