उत्तराखंडमध्ये गेल्या दीड महिन्यात १६ हजाराहून अधिक लहान मुलांना तसंच १९ वर्षांपर्यंतच्या किशोरवयीन मुलांना करोनाची लागण झाली आहे. राज्याच्या नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ९ वर्षे वयोगटातल्या ३ हजार २० मुलांना तर १० ते १९ वर्षे वयोगटातल्या १३ हजार ३९३ किशोरवयीन मुलांना करोनाची लागण झाली आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा पहिला रुग्ण राज्यात आढळून आला. साधारण एका वर्षामध्ये उत्तराखंडमधल्या १० हजार ७४० लहान आणि किशोरवयीन मुलांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. पण एप्रिल या एकाच महिन्यामध्ये हा आकडा १८ हजारांच्या पुढे गेलेला आहे.

हेही वाचा- करोनावर मात करणाऱ्यांना ९ महिन्यांनंतर लस देण्यात यावी; सरकारी पॅनलचा सल्ला

त्यामुळे आता असा प्रश्न उभा राहत आहे की, उत्तराखंडमध्ये करोनाची तिसरी लाट पोहोचली आहे का, ज्या लाटेमध्ये सगळ्यात जास्त धोका लहान मुलांना संभवतो.
बीबीसीने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. उत्तराखंडमधले राष्ट्रीय आरोग्य मिशनचे डॉक्टरचे सरोज नैथानी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, हे आकडे सूचक आहेत, जे आपल्याला पुढच्या भीषण परिस्थितीची जाणिव करुन देणारे आहेत.

करोनाबाधितांपैकी काही मुले अशा वर्गामधली आहेत की ज्यांचा जास्तीत जास्त वेळ हा घरात व्हि़डिओ गेम्स, टीव्ही यांच्यातच जातो. तर दुसऱ्या वर्गामध्ये छोटी कॉलनी किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचा समावेश होतो. तर या दोन्ही गटांव्यतिरिक्त तिसऱ्याही गटातली मुले आहेत. ही मुले उत्तराखंडच्या डोंगराळ भागात राहणारी आहेत. अनेकांचा समज असा असतो की डोंगराळ भागात करोना पोहोचला नाही.
डॉ. सरोज सांगतात की, ही मुलं बाहेर पडत नसतीलही. पण त्यांचे आईबाबा किंवा घरातल्या इतर व्यक्ती बाहेर पडत असतात, तर त्यांच्या माध्यमातून या आजाराचा प्रसार झाला असावा.

समजून घ्या- असं काय झालं की प्लाझ्मा थेरपी उपचारातून वगळावी लागली?

डॉक्टर पुढे सांगतात, “आपण जर महामारीचा इतिहास लक्षात घेतला तर आपल्याला असं दिसून येईल की साधारणपणे तीन ते चार लाटा येतात. विषाणू सध्या आपला विस्तार करत आहे. देशात आत्ता कुठे १८ वर्षांवरच्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण लसींच्या कमतरतेमुळे हे पूर्ण वर्ष लसीकरणासाठी लागू शकतं. आता राहिली १८ वर्षांच्या खालची मुलं. त्यांना आता करोनाचा मोठा धोका आहे.”