भारतातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा गुंतवणुकीवर व क्रयशक्तीवर विपरीत परिणाम दीर्घकाळासाठी होणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२० – मार्च २०२१) भारताची अर्थव्यवस्था तब्बल नऊ टक्क्यांनी आकुंचन पावणार असल्याचा अंदाज एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज या पतनिर्धारण संस्थेने व्यक्त केला आहे. या आधी संस्थेने भारताची अर्थव्यवस्था पाच टक्क्यांनी आकुंचन पावेल असा अंदाज वर्तवला होता. परंतु कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीवर मर्यादा आल्याचे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जचे आशिया पॅसिफिकचे अर्थतज्ज्ञ विश्रुत राणा यांनी सांगितले.

मार्च ते जून २०२० या कालावधीत गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था तब्बल २३.९ टक्क्यांनी घसरली. करोनाची जागतिक महामारी, तिला आळा घालण्यासाठी केलेला लॉकडाइन यामुळे खासगी क्षेत्रातील एकूण खरेदीक्षमता तब्बल २६.७ टक्क्यांनी घटली, तर स्थिर गुंतवणूक ४७.१ टक्क्यांनी घसरली. परंतु समाधानकारक पावसामुळे कृषि क्षेत्रामध्ये मात्र वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या घसरणीला थोडाफार चाप बसल्याचेही या कालावधीत दिसून आले आहे.

“जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी महामारीची साथ सुरूच राहणार असल्यामुळे आर्थिक वाढीला आळा बसणार असल्याचा आमचा अंदाज आहे,” असे राणा म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर ११ रोजी संपलेल्या आठवड्यात दरदिवशी सरासरी ९०,००० जणांना करोनाची बाधा झाली आहे. जोपर्यंत करोनाचा धोका कायम राहील तोपर्यंत ग्राहक खर्च करताना तसेच कंपन्या गुंतवणूक करताना हात आखडता घेतील असे राणा यांनी सांगितले.

औद्योगिक व्यवहार सुरळित होत असले तरी उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच राहणार असल्यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत जीडीपीची वाढ निगेटिव्ह राहणार असल्याचा अंदाज एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने वर्तवला आहे.