पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडत असतानाच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील टाइम्स स्क्वेअर प्रभू रामांची प्रतिमा झळवण्याचा मानस अपुराच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. टाइम्स स्क्वेअरमधील बिलबोर्डची मालकी असणाऱ्या प्रमुख जाहिरातदार कंपनीने प्रभू रामांची प्रतिमा झळकवण्यासाठी नकार दिला आहे. मुस्लीम समाजातील काही जणांनी आक्षेप घेतल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील वृत्त क्लिरीयन इंडिया या वेबसाईटने दिलं आहे.

नक्की पाहा खास फोटो >> राम मंदिर भूमिपूजन : जाणून घ्या कोण कोण लावणार हजेरी आणि कोण राहणार गैरहजर

अमेरिकेतील काही मुस्लीम समाजासंदर्भात काम करणाऱ्या गटांनी टाइम्स स्क्वेअरवर जाहिराती करणाऱ्या ब्रॅण्डेड साइट्स या कंपनीकडे ५ ऑगस्ट रोजी प्रभू रामांची प्रतिमा टाइम्स स्क्वेअरवर झळकवण्याचे कॅम्पेन करु नये अशी मागणी केली. या मागणीनंतरच कंपनीने कॅम्पेन करण्यास नकार दिला आहे. टाइम्स स्क्वेअरवरील नॅसडॅकची स्क्रीन ही काही विशेष दिवसांच्या निमित्ताने रोषणाई करुन सजवली जाते. त्यासाठी ही स्क्रीन भाड्याने दिली जाते. १७ हजार फूट आणि वर्तुळाकार अशा या एलईडी स्क्रीनवर  प्रभू रामांची प्रतिकृती झळकवली जाणार आहे. ही टाइम्स स्क्वेअरवरील सर्वात स्पष्ट आणि सर्वाधिक रेझोल्यूनश असणारी एलईडी स्क्रीन आहे. तसेच जगभरातील विशेष दिवसांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या टाइम्स स्क्वेअरवर ही असल्याने तिला अधिक महत्व आहे. मात्र आता मुस्लीम समाजाने केलेल्या विरोधानंतर न्यूयॉर्कमधील अमेरिकन इंडियन पब्लिक अफेर कमिटीच्या वतीने नियोजित कॅम्पेन करता येणार नाही.

प्रभू रामांची प्रतिमा झळकवण्याला विरोध करणाऱ्या गटांपैकी एक असणाऱ्या आयएमनेट या गटाने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. “आम्ही न्यूयॉर्कचे महापौर, शहर समिती, राज्यपाल, निवडून आलेले स्थानिक नेते आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हला विनंती करतो की त्यांनी उजव्या विचारसणीच्या हिंदू गटांना टाइम्स स्क्वेअरवरील बिलबोर्डवर जाहीरात करु देऊ नये,” असं म्हटलं होतं. या गटाचे अध्यक्ष असणाऱ्या डॉ. शेख उबाइड यांनी कंपनीने कॅम्पेन न करण्याच्या निर्णयासंदर्भात समाधान व्यक्त केलं आहे. “हा लोकप्रियतेचा, मानवी हक्काचा आणि कायद्याचा विजय आहे,” असं शेख म्हणाले.

नक्की पाहा खास फोटो >> अयोध्या सजली… शहरातील घरं, रस्ते, दुकानं सारं काही ग्राफिटी पेंटिगने नटली

काय होतं हे कॅम्पेन

पाच ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री १० वाजल्यापर्यंत या स्क्रीनवर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी विशेष फोटो आणि व्हिडिओ दाखवले जाणार होते. यामध्ये ‘जय श्रीराम’ असा हिंदी आणि इंग्रजीमधील मजकूर, प्रभू रामांची चित्रं, व्हिडिओ आणि थ्री डी चित्रंही दाखवली जाणार होती. तसेच मंदिराची रचना कशी असेल याचबरोबर त्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याचे फोटोही या स्क्रीनवर दाखवण्यात येणार होते. त्यामुळेच अयोध्येबरोबरच जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ असणाऱ्या टाइम्स स्कवेअरवरही जय श्रीरामच्या घोषणा आणि फोटो दाखवले जाणार होते. न्यूयॉर्क शहरामधील हिंदू धर्मीय समाजाचे प्रमुख आणि अमेरिकन इंडियन पब्लिक अफेर कमिटीचे अध्यक्ष जगदीश शेहानी यांनी काही दिवसांपूर्वी पीटीआयशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली होती.  ५ ऑगस्ट रोजी टाइम्स स्क्वेअरवर हिंदू समाजातील लोकं आनंदोत्सव साजरा करणार असल्याचे जगदीश म्हणाले होते. “टाइम्स स्क्वेअरवर मिठाई वाटली जाणार आहे. असा दिवस आय़ुष्यातून एकदाच आणि शतकामध्ये खूपच कमी वेळा पहायला मिळतो. त्यामुळे आम्ही जोरदार पद्धतीने हा साजरा करणार आहोत. त्यासाठी टाइम्स स्क्वेअरसारख्या जागेपेक्षा अधिक चांगले ठिकाण कोणते असू शकते,” असंही जगदीश यांनी म्हटलं होतं.

“अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचे जगभरातील हिंदूंचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. हा दिवस आम्हाला एवढ्या लवकर पहायला मिळेल असा विचारही आम्ही सहा वर्षांपूर्वी केला नव्हता. मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे शक्य झालं आहे,” अशा शब्दांमध्ये जगदीश यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. टाइम्स स्क्वेअरवर हा सोहळा साजरा करण्यासाठी हिंदू समाजातील अनेकांनी पुढाकार घेत आर्थिक आणि इतर मदत केल्याने आम्हाला या आनंदामध्ये अमेरिकेतून सहभागी होता येणार असल्याचेही जगदीश म्हणाले होते.