माजी मंत्री व काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा थरूर यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी राजकीय नेते अमर सिंह यांचे दोन तास जाबजबाब घेण्यात आले. सुनंदा यांच्या मृत्यूपूर्वी त्या आयपीएल वादाबाबत अमरसिंह यांच्याशी बोलल्या होत्या असा दावा करण्यात आला होता.
सूत्रांनी सांगितले की, अमरसिंह यांना सुनंदा थरूर यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत विचारण्यात आले. समाजवादी पक्षाचे माजी नेते असलेले अमरसिंह हे थरूर यांचे जवळचे मित्र आहेत व सुनंदा यांनी शशी थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी असेलल्या संबंधांबाबतही अमरसिंह यांच्याशी चर्चा केल्याचे बोलले जाते.
सिंह यांनी सांगितले की त्यांचे दोन तास जाबजबाब घेण्यात आले पण विशेष चौकशी पथकाने नेमके काय प्रश्न विचारले हे सांगण्यास नकार दिला.
सुनंदा थरूर यांचा खून झाला त्यामुळे सत्य लपवण्यात काही अर्थ नाही पण याचा अर्थ आपण शशी थरूर यांचे सदिच्छुक नाही असे नाही, किंवा त्यांच्यावर काही आरोप करतो असेही नाही, ते आपल्या मैत्रिणीचे पती आहेत व त्यामुळे कुणावर आरोप करण्याचा प्रश्न येत नाही, सुनंदा यांच्याविषयी जे माहिती होते ते आपण सांगितले. आता या प्रकरणी विशेष चौकशी पथकाने लक्ष घातले असल्याने आपण त्यावर आणखी काही बोलणार नाही असे अमरसिंग म्हणाले.दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले की, या प्रकरणी माहिती मिळवण्यासाठी त्यांचे जबाब घेण्यात आले. काही गोष्टींची अमरसिंह यांच्याकडून खात्री करून घ्यायची होती. सुनंदा पुष्कर यांच्या आधीच्या विवाहातील पुत्र शिव मेनन यांनाही जबाबासाठी बोलावले जाणार आहे. तसेच शशी थरूर यांनाही पुन्हा बोलावले जाईल.