देशातील पहिली खासगी ट्रेन ‘तेजस एक्स्प्रेस’ला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना भरपाई दिली जाणार आहे. एखाद्या ट्रेनला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना भरपाई देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. आयआरसीटीसीकडून प्रवाशांना ही भरपाई दिली जाणार आहे.

शनिवारी लखनऊ- नवी दिल्ली ‘तेजस एक्स्प्रेस’ला दोन्ही बाजूंनी उशीर झाला. यावेळी लखनऊ येथून दिल्लीला जाणारे ४५१ प्रवासी होते. तर दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधून ५०० प्रवासी प्रवास करत होते. ‘तेजस’ची नवी दिल्ली स्थानकावर पोहोचण्याची वेळ दुपारी 12 वाजून 25 मिनिट आहे. पण ही गाडी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली. जवळपास तीन तासांचा उशीर ट्रेनला झाला. यानंतर रात्रीही ही ट्रेन लखनऊला रात्री १० वाजून पाच मिनिटांऐवजी 11 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली. आता प्रवाशांना ट्रेनला उशीर झाल्यामुळे भरपाई म्हणून 250 रुपये मिळणार आहेत. आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भरपाईसाठी सर्व प्रवाशांच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवली आहे. या लिंकवर क्लिक करून प्रवासी भरपाईची मागणी करू शकतात.

काय आहे नियम –

आयआरसीटीसीनुसार, तेजस एक्स्प्रेसला एक तासांहून थोडाफार उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये भरपाई आणि दोन तासांहून अधिक उशीर झाल्यास 250 रुपये भरपाई मिळेल. देशात पहिल्यांदाच  एखाद्या ट्रेनला उशीर झाल्याने प्रवाशांना भरपाई मिळणार आहे. लखनऊ जंक्शन येथे कृषक एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्याचा फटका तेजस एक्स्प्रेसला बसला.

Story img Loader