चोरी करणाऱ्या चोराचा पाठलाग करणारे पोलिस आपण अनेक सिनेमांमध्ये पहिले असतील. मात्र बंगळुरुमध्ये एका चोरी करुन ट्रेनने दुसऱ्या राज्यात पळून गेलेल्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क विमानाने प्रवास केला आणि चोर शेवटच्या स्थानकावर उतरला तेव्हा त्याला बेड्या घातल्या. एखाद्या सिनेमातील घटना वाटावी अशी ही कामगिरी करुन दाखवली आहे बंगळुरू पोलिसांनी.

बंगळुरूमधील २१ वर्षीय कुशल सिंग हा एका व्यवसायिकाच्या घरी नोकर म्हणून काम करत होता. त्याने याच घरामध्ये डल्ला मारुन सर्व सोन्याचे दागिने चोरले. त्यानंतर मूळचा राजस्थानमधील अजमेर येथील असणाऱ्या कुशलने हे चोरलेले दागिने घेऊन मूळगावी परत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला. मात्र ज्यावेळेस कुशल तीन दिवस ट्रेनचा प्रवास करुन अजमेरला पोहचला तेव्हा रेल्वे स्थानकामध्ये बंगळुरू पोलिस त्याची वाट पाहत होते. कुशलने चोरीचा माल घेऊन तीन दिवस ट्रेनने प्रवास केला तर पोलिसांनी विमानाने अवघ्या काही तासांमध्ये राजस्थान गाठत कुशलला अटक केली.

बंगळुरू येथील बासवानागुडी येथे राहणारे उद्योजक मेहक व्ही पिरंगल यांच्याकडे कुशल २७ ऑक्टोबरपासून नोकर म्हणून काम करत होता. एका ओळखीतील व्यक्तीने कुशलची शिफारस केल्याने मेहक यांनी त्याला कामावर ठेवले होते. त्याच दिवशी चिकपट येथील आपल्या कापडाच्या दुकानामध्ये पुजा करण्यासाठी पिरंगल कुटुंब गेले. त्यावेळी त्यांनी कुशल याला घरात थांबण्यास सांगितले. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पिरंगल कुटुंब बाहेर गेले आणि नऊच्या सुमारास परत आले. मात्र त्यावेळी त्यांना घरातील सर्व दागिने चोरुन कुशलने पळ काढल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मेहक यांनी लगेचच यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. कुशलच्या फोन क्रमांकावरुन माहिती काढली असता तो अजमेरला जात असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने विमानाने रायपूर गाठले आणि त्यानंतर ते अमेरला गेले. चोरी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी कुशल अमेरमध्ये दाखल झाला. तो अजमेर रेल्वे स्थानकामध्ये उतरताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि ते त्याला पुन्हा बंगळुरूला गेले. कुशलने चोरलेले दागिने कोणाला विकण्यासाठी वेळ मिळू नये म्हणून पोलिसांनी विमानाने प्रवास करत त्याच्याआधीच अजमेरला पोहचले. “कुशल हा पहिल्यांदाच बंगळुरुला आला होता. अल्पावधीमध्ये जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने ही चोरी केली,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.