उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमधील स्यानात भडकलेल्या हिंसाचारात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ आणि बजरंग दलाचा हात असल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते आणि योगी सरकारमधील मंत्री ओ. पी. राजभर यांनी केला आहे.


राजभर म्हणाले, विहिंप, बजरंग दल आणि आरएसएसने बुलंदशहरमध्ये हिंसाचारासाठी षडयंत्र रचले होते. तसेच पोलिसही काही भाजपाच्या सदस्यांची नावे घेत आहेत. यावरुन यात काही भाजपाच्या लोकांचाही समावेश असावा असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

ज्या दिवशी मुस्लिम इज्तेमाचा कार्यक्रम होता त्याच दिवशी हा हिंसाचार कसा झाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यावरुन हा बुलंदशहराची शांती भंग करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे योगी सरकारच्या मंत्र्यानेच भाजपा आणि त्यांच्या संलग्न संघटनांवर गंभीर आरोप केल्याने आता सरकारची अडचण झाली आहे.

गोमांसाच्या संशयावरुन सोमवारी स्यानामध्ये झालेल्या हिंसाचारात पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या हिंसाचारात एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता.

Story img Loader