करवाढ आणि दुचाकी-चारचाकी वाहनाची विक्री घसरल्याने वाहनक्षेत्रावर मंदी आली आहे. या मंदीचा परिणाम थेट या क्षेत्रातील रोजगारावर झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या एका वर्षात वाहन क्षेत्रातील कार, ट्रक, ट्रॅक्टर, मोटरसायकल्स अशा सर्वच प्रकारच्या उत्पादनांची विक्री मंदावली आहे. त्यामुळे काही कंपन्यांनी उत्पादन घटवत काही युनिट्स बंद केल्याने एप्रिलपासून लाखो लोक बेरोजगार झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर वाहनक्षेत्रातील रोजगार कपातीचा आकडा भरमसाठ वाढला आहे. वाहनक्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी करकपात करून अर्थ पुरवठा सुलभ करण्यात यावा, अशी मागणी या क्षेत्राकडून केंद्रीय अर्थमंत्र्याकडे बुधवारी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दुचाकी आणि चारचाकीची विक्री कमी झाल्याचा विपरित परिणाम वाहन निर्मिती क्षेत्रावर झाला असुन वाहन उत्पादक, सुटे भाग तयार करणारे उद्योग आणि वितरक यांनी गेल्या एप्रिल महिन्यांपासून ३,५०,००० कामगारांना कमी केल्याचे वृत्त रॉयटक्सनं दिलं आहे. कार आणि दुचाकी निर्मिती कंपन्यांनी १५ हजार, तर सुटे भाग तयार करणाऱ्यांनी १ लाख कामगार कपात केली आहे. तसेच अनेकांनी उत्पादनही बंद केले आहे. जवळपास पाच कंपन्यांनी कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या तब्बल ३,५०,००० कर्मचाऱ्यांचा रोजगार गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वाहनक्षेत्रातील मंदीमुळे वाहन उद्योजक आणि वितरकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे. विक्री घटल्याने जपानची वाहनउत्पादक कंपनी यामाहा आणि सुटे भाग तयार करणाऱ्या व्हॅलीओ अॅण्ड सुब्रोस यांनी १,७०० कंत्राटी कर्मचारी कमी केले आहेत. देशातील बेरोजगारीचा प्रमाण वर्षभरात ५.६६ टक्क्यावरून जुलै २०१९ मध्ये ७.५१ टक्क्यांवर पोहोचले आहे.
वाहन उद्योग सध्या मंदीच्या अनुभवातून जात आहे, असे मत एसीएमचे महासंचालक विन्नी मेहता यांनी व्यक्त केले आहे. तर येणाऱ्या काळात १५ वाहन उत्पादक कंपन्यांमधील ७ टक्के कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागेल, अशी भीती एसआयएएमचे महासंचालक विष्णू माथूर यांनी व्यक्त केली आहे.