अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये टिकटॉक आणि वीचॅटवर घातलेली बंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील अध्यादेशावर बायडन यांनी बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) स्वाक्षरी केली. तसेच त्यांनी चीनबरोबरच इतर राष्ट्रांकडून होणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्यांसंदर्भातही एक आदेश जारी केला आहे. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान आणि संवाद यंत्रणेसंदर्भातील सुरक्षेचा आदेश बायडन यांनी पारित केलाय.

“आज राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी एक्झीक्युटीव्ह ऑर्डरवर स्वाक्षरी केली आहे. १५ मे २०१९ रोजी (माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासंदर्भातील) राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान जारी करण्यात आलेले आदेशांमध्ये बदल करुन अमेरिकन माहिती आणि तंत्रज्ञान तसेच सेवा पुरवठा यंत्रणेच्या सुरक्षा अधिक सक्षम करण्याचा निर्णय नवीन आदेशांनुसार घेण्यात येत आहे,” असं म्हटलं आहे. या आदेशामुळे अमेरिकेतील डिजीटल माहिती अधिक सुरक्षित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

नक्की वाचा >> राष्ट्रध्यक्षांचं Tweet Delete केल्याने ‘या’ देशाने ट्विटरवर घातली बंदी; निर्णयामुळे भारतीय कंपनीला ‘अच्छे दिन’?

“राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी टिकटॉक आणि वीचॅटवर बंदी घालणारे आदेश रद्द केले आहेत. त्याचप्रमाणे इतर आठ संवाद तसेच आर्थिक देवाणघेवाणीसंदर्भातील सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्सवरील बंदीही ठवण्यात आलीय,” असंही या आदेशात म्हटलं आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चिनी अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्यासंदर्भात २०२० साली आदेश जारी करत अमेरिकन अ‍ॅप स्टोअर्सवरुन काही अ‍ॅप काढून टाकण्याचे आदेश जारी केलेले. तसेच अमेरिकेमध्ये या कंपन्यांना व्यवसाय करु न देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला.

नक्की वाचा >> व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौचींचे ईमेल्स लीक; समोर आलं चीन कनेक्शन

यादी वाढली पण टिकटॉक वगळलं

याच आठवड्याच्या सुरवातीला बायडन प्रशासनाने चिनी लष्कराशी आणि हेरगिरीशीसंदर्भातील ५९ कंपन्यांवर बंदी घातलीय. या कंपन्या अमेरिकन गुंतवणूकदारांनी विकत घेतलेल्या कंपन्या आहेत. ट्रम्प यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ४४ कंपन्यांवर बंदी घातली होती. बायडन यांनी यामध्ये आणखीन १५ कंपन्यांचा समावेश केला असला तरी टिकटॉक आणि वीचॅटसारख्या लोकप्रिय कंपन्यांना या नव्या यादीतून वगळण्यात आलं आहे.

अयोग्य पद्धतीने स्पर्धा करणाऱ्या कोणत्याही परदेशी कंपनीवर आम्ही निर्बंध घालून असं बायडन प्रशासनाने मंगळवारीच स्पष्ट केलेलं. अमेरिकेतील माहिती साखळी, पुरवठा साखळीवर परिणाम करणाऱ्या कंपन्यांना चीनकडून धोका असल्याचंही सांगण्यात आलेलं. चीनमधील कंपन्यांना आव्हान देण्यासाठी अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रामधील कंपन्यांमध्ये २०० बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय अमेरिकन सिनेटने घेतला आहे.

नक्की वाचा >> “ट्विटर East India Company सारखं वागू लागलंय, इथूनच पैसा कमावायचा आणि…”; VHP ने व्यक्त केला संताप

भारतही चिनी अ‍ॅप्सवरील बंदी उठवणार का?

अमेरिकेने टिकटॉकवरील बंदी उठवल्यानंतर भारतसुद्धा चिनी अ‍ॅप्सवर टाकलेली बंदी उठवणार का यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. गलवान खोऱ्यामध्ये मागील वर्षी झालेल्या भारत-चीनदरम्यानच्या रक्तरंजीत संघर्षानंतर भारताने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, वीचॅट, पबजी, कॅमस्कॅनसारख्या अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश होता.