भारतात आता करोना हा हा म्हणता पुन्हा पसरू लागला आहे. करोनाची रोजची आकडेवारी पाहाता करोनाचा विळखा देशाला अधिकाधिक घट्टपणे पडू लागल्याचं स्पष्ट होऊ लागलं आहे. गेल्या २४ तासांत तर भारतात तब्बल ४ लाख १ हजार ९९३ नवे करोनाबाधित सापडले आहेत. २४ तासांत ४ लाखांहून जास्त करोना रुग्ण सापडलेला भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. या आकडेवारीमुळे एक नकोसा विक्रम भारताच्या नावावर आला आहे. त्यामुळे देशातल्या करोनाबाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या आता १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ इतकी झाली आहे. यासोबतच गेल्या २४ तासांमध्ये देशात ३ हजार ५२३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे.

 

करोनाबाधितांच्या संख्येमध्ये भारतानं विक्रमी वाढ नोंदवली असली, तरी दुसरीकडे दिवसभरात एकूण २ लाख ९९ हजार ९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ही बाब करोनाच्या दाहकतेसमोर देखील देशवासीयांसाठी दिलासादायक ठरली आहे. त्यामुळे आता भारतात करोनातून बरे झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ इतका झाला आहे.

मृतांचे वाढते आकडे!

मात्र, एकीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त असलं, तरी करोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या आणि त्यात सातत्याने होणारी वाढ ही आरोग्य व्यवस्थेसाठी चिंतेची आणि गंभीर बाब ठरली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ हजार ५२३ करोना रुग्ण दगावले असून एकूण मृतांचा आकडा देशात आता २ लाख ११ हजार ८५३ इतका झाला आहे. फक्त एप्रिल महिन्यातच देशात तब्बल ४५ हजार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची भीषण आकडेवारी समोर आली आहे.

करोना नव्हे मृत्यूची त्सुनामी! अवघ्या एका महिन्यात ४५,००० नागरिकांचा मृत्यू

काय सांगते आकडेवारी?

१ एप्रिल रोजी देशातील एकूण करोना रुग्णसंख्या होती १,२३,०२,११५ आणि एकूण मृत्यू संख्या होती १,६३,४२८. तर देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ६,१०,९२९ इतकी. ही सख्या ३० एप्रिल रोजी प्रचंड बदलून गेली. ३० एप्रिल रोजी देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या पोहोचली १,८७,५४,९८४ आणि मृतांचा आकडा पोहोचला २,०८,३१३ वर. तर ३० एप्रिल रोजी देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ३१,६४,८२५ इतकी! त्यामुळे वाढते मृत्यू रोखण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर उभं राहिलं आहे. त्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर यांच्या तुटवड्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होऊ लागली आहे.