भारतीय जवानांच्या गोळीबारानंतर माघार

जम्मू : रातनुचाक—कालुचाक लष्करी भागात सोमवारी दोन ड्रोन्सवर लष्कराच्या जवानांनी सतर्कता दाखवत गोळीबार केला. आदल्या दिवशी, रविवारी दहशतवाद्यांनी जम्मूच्या हवाई दल तळावर ड्रोन्सच्या मदतीने स्फोटके टाकून हल्ला केला होता. त्यानंतर रविवारी रात्री ११.४५ वाजता पुन्हा एक ड्रोन विमान हद्द ओलांडून आले होते. त्यानंतर दुसरे ड्रोन पहाटे २.४० वाजता आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तेथे उपस्थित सैनिकांनी गोळीबार करताच ही दोन्ही ड्रोन विमाने माघारी गेली.

अधिकाऱ्यांनी सांगितले,की जलद प्रतिसाद दलास सतर्कतेचे आदेश देऊन परदेशी ड्रोन्सवर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जम्मूतील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारच्या हल्लय़ानंतर या भागात सतर्कता बाळगण्यात येत आहे.  या हल्लय़ानंतर पुन्हा दोन ड्रोन विमाने आली होती, त्यांच्यावर गोळीबार करताच ती माघारी गेली. यातून मोठा धोका टळला आहे. आमच्या जवानांनी सतर्कता दाखवून या ड्रोन विमानांना  पिटाळून लावले. सुरक्षा दले सतर्क असून हे ड्रोन खाली पाडण्यासाठी गोळीबार करण्यात आला.

दरम्यान लष्करी केंद्राच्या सभोवताली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कसून शोधमोहीम चालू आहे. आतापर्यंत तरी जमिनीवर काही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. दहशतवाद्यांनी ड्रोन विमानातून स्फोटके पाठवून रविवारी भारतीय हवाई दल केंद्रावर हल्ला केला होता, त्यात दोन बॉम्बचा समावेश होता. त्यात दोन अधिकारी जखमी झाले होते. ड्रोन्सच्या मदतीने जम्मूत करण्यात आलेला हा पहिलाच हल्ला होता.

२००२ मध्ये रतनुचाक व कालुचाक येथे दहशतवादी हल्ल्यात ३१ जण ठार झाले होते, त्यात दहा मुलांचा समावेश होता. सोमवारी अधिकाऱ्यांनी सांगितले,की दोन ड्रोन विमाने खाली पाडण्यासाठी गोळीबाराच्या किमान डझनभर फैरी झाडण्यात आल्या. दोन वेगवेगळे ड्रोन दिसत होते. ते रतनुचाक व कालुचाक लष्करी भागात होते. पण त्या वेळी भारतीय सैनिक सतर्क होते. भारतीय सैन्याने गोळीबार करताच दोन्ही ड्रोन माघारी गेले व मोठा धोका टळला. सुरक्षा दलांना अजूनही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.लष्करी ठिकाणाच्या आजूबाजूला असलेल्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून आक्षेपार्ह काही सापडलेले नाही. कालुचाक येथे २००२ मध्ये हल्ला झाल्यापासून तेथे नेहमीच सतर्कता असते. त्या वेळी हल्ल्यात तीन लष्करी जवानांसह ३१ जण ठार झाले होते, त्यात लष्करी जवानांचे १६ कुटुंबीय  मारले गेले. त्यात महिला व मुलांचा समावेश होता. एकूण ११ नागरिक त्यात मारले गेले. त्या वेळी झालेल्या हल्ल्यात ४८ जण जखमी झाले होते. त्यात १३ लष्करी जवान व जवानांचे २० कुटुंबीय व १५ नागरिक यांचा समावेश होता.

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचाही मृत्यू

जम्मू : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या विशेष पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. ती, तिचे वडील व आई असे तिघेही या हल्ल्यात मारले गेले असून जम्मूतील ड्रोन हल्ल्यानंतर काही काळातच रविवारी हा हल्ला झाला होता. त्यात जैश ए महंमदचे दोन दहशतवादी व एक परदेशी नागरिक सामील असल्याचे वृत्त आहे.

रविवारी रात्री अकरा वाजता विशेष पोलीस अधिकारी फयाझ अहमद, त्यांची पत्नी व मुलगी यांच्यावर घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यांच्या देहांची गोळीबारात चाळण झाली होती. रुग्णालयात दाखल केले असता विशेष पोलीस अधिकारी फयाझ अहमद व पत्नी राजा  बेगम यांचा मृत्यू झाला. त्यांची कन्या रफिया हिला रुग्णालयात दाखल केले होते पण सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, जैश ए महंमदचे दोन दहशतवादी व एक परदेशी नागरिक यांचा या हल्ल्यात सहभाग आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, फयाझ अहमद यांची पत्नी व मुलगी यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण दहशतवाद्यांनी त्या दोघींवर गोळीबार केला. काल रात्री दोन  दहशतवादी व एक परदेशी नागरिक यांचा या भागात वावर होता त्यांची ओळख पटवली जाऊन पकडण्यात येईल असे सांगण्यात आले. जम्मूत हवाई दलाच्या केंद्रात एकूण सहा किलो स्फोटके असलेल्या ड्रोन विमानांच्या सहाय्याने दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबावर हल्ल्याची घटना घडली. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की,  फयाझ अहमद, त्यांची पत्नी व मुलीची दहशतवाद्यांनी घरात घुसून हत्या केली. या कृत्याचा आपण निषेध करतो.

हा भ्याड दहशतवादी हल्ला होता. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले की, अवांतीपोरा येथे झालेल्या या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत. पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांनी सांगितले की, अतिशय भयानक असा हा हल्ला होता. सगळे कुटुंब दहशतवाद्यांनी गोळीबार करून संपवले. भाजपचे जम्मू-काश्मीरचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी म्हटले आहे की, भ्याड व क्रूर असा हा हल्ला होता. घरात घुसून पोलीस अधिकारी, त्यांची पत्नी व कन्या यांना ठार करण्यात आले. हा दहशतवादच आहे. महिलांना ठार मारणे हे शौर्य नाही. त्याचा निषेध झालाच पाहिजे.