उत्तर प्रदेशातल्या बिकरु या गावात सत्तांतर झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच बिकरु गावाचा प्रमुख हा कुख्यात गँगस्टर विकास दुबे यांच्या परिवारातील नाही. गेल्या वर्षी याच गावात आठ पोलिस झटापटीत मारले गेले होते.

विजयी उमेदवार मधू यांनी त्यांचे विरोधी उमेदवार बिंदू कुमार यांना ५४ मतांनी हरवल्याची माहिती मिळत आहे. मधू यांनी एकूण ३८१ मतं मिळवली असून कुमार यांना ३२७ मतं मिळाली आहेत.

हे पद अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आलं होतं. या पदासाठी १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. निवडणूक जिंकल्यावर मधू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की त्यांनी समाजातल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ही निवडणूक लढवली होती.

गेली १५ वर्षे गँगस्टर विकास दुबे याच्या परिवारातले लोक ही निवडणूक बिनविरोध जिंकत आले होते, अशी माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशातल्या पंचायत निवडणुकीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठीची मतमोजणी सुरु झाली आहे. ८२९ केंद्रांवरची मतमोजमीची ही प्रक्रिया पूर्ण व्हायला २ दिवस लागतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

Story img Loader