अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मतमोजणी सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. मात्र मतमोजणीसाठी लागत असणारा वेळ आणि काही ठिकाणी थांबवण्यात आलेली मतमोजणी यामुळे सुरक्षेसंदर्भातील चिंता निर्माण झाली असून काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. काही शहरांमध्ये ट्रम्प आणि बायडेन समर्थकांमध्ये हिंसक झटापटी झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. ट्रम्प हे मतमोजणीमध्ये मागे पडल्यानंतर लगेचच वॉशिंग्टनमधील व्हाइट हाऊसच्याबाहेर ब्लॅक लाइव्ह मॅटर प्लाझाजवळ या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांचा पराभव होत असल्याने आनंद व्यक्त करण्याबरोबरच येथे मोठ्याने घोषणाबाजीही करण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर व्हाइट हाऊसच्याच बाहेर काही ठिकाणी ट्रम्प समर्थकही गोळा झाले आहेत. त्यामुळेच या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे.

नक्की पाहा >> पगार, भत्ते, घर, गाड्या, विमान अन्… अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या सुविधा पाहून चक्रावून जाल

वॉशिंग्टन, विस्कॉन्सिन, फिलाडेल्फिया, पोर्टलॅण्ड, न्यूयॉर्कसहीत अनेक ठिकाणी बायडन आणि ट्रम्प समर्थक समोर समोर आल्याचे पाहायला मिळालं. काही ठिकाणी या दोन्ही गटांमध्ये हिंसक झटपाटही झाल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी तर पोलीस विरोधक आंदोलक असं चित्रही दिसून आलं. असोसिएट फ्री प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अनेक शहरांमध्ये प्रत्येक मत मोजलं जावं म्हणजेच Count Every Vote अशा बॅनर्ससही लोकं रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळालं आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी शांततापूर्ण तर काही ठिकाणच्या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याचे चित्र दिसत आहे.

वॉशिंग्टनच्या महापौर मुरियल बाउसर यांनी, “काही लोकांनी मुद्दाम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला,” असं म्हटलं आहे. तर सिएटलमध्येही ट्रम्प यांच्याविरोधकांनी गाड्यांची वाहतूक अडवून धरली आहे. पोलिसांनी या ठिकाणी झालेल्या हिंसक झटापटीनंतर आठ जणांना अटक केली आहे. काही लोकांनी एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापैकी अनेकजण हे ब्लॅक लाइव्ह मॅटर आंदोलनातील आंदोलक असल्याचे सांगितले जात आहे.

न्यूयॉर्कमध्येही ट्रम्प यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी शहरामध्ये जागोजागी ट्रम्प समर्थकही रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे. “ट्रम्प नेहमी खोटं बोलतात,” असे पोस्टर्स आंदोलकांच्या हाती आहेत. आंदोलकानी काही ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांची नासधूस केली आहे. ज्या ठिकाणी हिंसा होऊ शकते अशी शक्यता आहे तेथे दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. तर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर हिंसक आंदोलन होण्याची भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे. न्यूयॉर्कमधील ट्रम्प यांच्या घराबाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरुन घोषणा देत आहेत. “Whose streets? Our streets!” आणि “If we don’t get no justice, they don’t get no peace!” अशा घोषणा आंदोलकांकडून दिल्या जात असल्याचे असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.