उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मागील दोन आठवड्यांमध्ये सतत चर्चेत असणारे तीरथ सिंह रावत पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळेस ते चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे त्यांनी केलेलं एक वक्तव्य. ‘अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केलं’, असं वक्तव्य रावत यांनी केलं आहे. मागील काही दिवसांमध्ये अशाप्रकारे वादग्रस्त आणि टीका होणारं वक्तव्य करण्याची रावत यांची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी रावत यांनी फाटक्या जीन्स (रिप्ट जीन्स) घालणाऱ्या महिलांच्या संस्कारासंदर्भात वक्तव्य केलं होतं. तर मुख्यमंत्री झाल्यानंतर एका ठिकाणी भाषण देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भविष्यात भगवान श्री राम आणि श्री कृष्णाप्रमाणे पुजा केली जाईल, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी चुकीचा संदर्भ देणारं वक्तव्य करुन विरोधकांना आयती संधी उपलब्ध करुन दिलीय.

नक्की वाचा >> “CM साहेब, जीन्स नाही तुमचा मेंदू फाटलाय”; महिला नेत्या तीरथ सिंह रावतांवर संतापल्या

या करोना कालावधीमध्ये भारतामध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसते तर काय झालं असतं कोणीही सांगू शकत नाही. मात्र आपली परिस्थिती आतापेक्षा वाईट असती. पंतप्रधान मोदींनी आपल्याला खूप दिलासा देणारे निर्णय घेतले, अशा शब्दांमध्ये तीरथ सिंह रावत यांनी मोदींचे गुणगाण गायले. पुढे बोलताना, “इतर देशांपेक्षा भारत करोना परिस्थिती अगदी छान पद्धतीने हाताळत आहेत. अमेरिका ज्यांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केलं, ज्यांनी जगावरराज्य केलं ते या करोनाचा सामना करताना डळमळत आहेत. अमेरिकेमध्ये ३.७५ लाखांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था असणाऱ्या इटलीमध्ये करोनामुळे ५० लाख जणांचा जीव गेला असून लवकरच तिथे नव्याने लॉकडाउन लागू होणार आहे,” असंही रावत म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेचे प्राण वाचवण्यासाठी काम केलं असं सांगतानाच रावत यांनी आपणही मोदींनी दिलेला मास्क घाला, हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझर वापरा हा मंत्र पाळत असल्याचं सांगितलं. रावत यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपाचा एक नेता आपल्याला शिक्षणाचे महत्व किती आहे पटवून देताना, असं म्हणत एका काँग्रेस नेत्याने रावत यांच्या या वक्तव्यावर टीका केलीय. तर समाजवादी पक्षाचे नेते जुही सिंग यांनी अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केलं पण कधी?, असा सवाल उपस्थित केलाय.