राज्यांनी उपलब्ध प्राणवायू हा महत्त्वाची बाब म्हणून काळजीपूर्वक उपलब्ध करावा. खासगी व सरकारी रुग्णालयांच्या प्राणवायू वापराचे लेखा परीक्षण करावे, अशी सूचना केंद्राने राज्यांना केली आहे. प्राणवायूचा देशात तुटवडा असताना तो महत्त्वाची बाब म्हणून वापरण्याची व त्यात  जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असे केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सह सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, करोना साथीच्या सुरुवातीपासून सरकारने प्राणवायूयुक्त बेड हे महत्त्वाचे मानले जावेत असे सांगून धोरणात्मक निर्णय जाहीर केला होता. सरकारने १ लाख २ हजार ४०० प्राणवायू टाक्या एप्रिल-मे २०२० मध्ये खरेदी केल्या व त्या राज्यांना वाटप केल्या. प्राणवायूचा महत्त्वाच्या वस्तू प्रवर्गात समावेश करण्याची गरज असून वापर योग्य प्रकारे केला पाहिजे.

राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने द्रव वैद्यकीय प्राणवायूच्या किमती व दर निश्चिात केले आहेत. १६२ विशेष दाबयुक्त प्रकल्प देशभरात मंजूर  करण्यात आले असून १५४ मेट्रिक टन इतकी प्रत्येक प्रकल्पाची क्षमता आहे. ५२ प्रकल्प स्थापित झाले असून ८७ प्रकल्पात उत्पादन सुरू झाले आहे. पीएसए प्राणवायू प्रकल्पातून रुग्णालयांना थेट प्राणवायू मिळू शकणार आहे. २१ एप्रिलला १ लाख २७ हजार प्राणवायू टाक्यांची मागणी नोंदवण्यात आली असून दोन दिवसात पुरवठा सुरू होईल. या व्यतिरिक्त ५५१ पीएसए प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.

दैनंदिन रुग्णवाढ घातक

गेल्या १४ दिवसांत झालेली दैनंदिन रुग्णवाढ घातक असून कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गोवा, ओडिशा या राज्यांत शिखरावस्था गाठली गेली आहे. अजूनही तेथे रुग्णवाढ कायम आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, आंध्र प्रदेश, दिल्ली या राज्यांत शिखरावस्था अपेक्षेपेक्षा खूप गंभीर दिसून आली त्यात जास्तीत जास्त रुग्ण सापडले. उत्तर प्रदेशात गेल्या चार आठवड्यांत दैनंदिन सरासरी रुग्णसंख्या वाढली, दिल्लीत बळी गेलेल्यांची संख्या देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.