उत्तर प्रदेशमधील बुंदेलशहर जिल्ह्यामध्ये एका छोट्याश्या वादामधून १४ वर्षीय मुलाला प्राण गमावावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शिकरपूर शहरामध्ये सरस्वती इटर कॉलेजमध्ये दहाव्या इयत्तेत असणाऱ्या सुरज भान याने आपल्या वर्गमित्राची हत्या केली. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे या दोघांमध्ये वर्गातील बैठक व्यवस्था म्हणजेच कोणी कुठे बसावं यावरुन झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाली.

साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी आरोपी सुरज आणि त्याच्या मित्रामध्ये वर्गात बसण्यावरुन अगदी कडाक्याचं भांडण झालं. या भांडणाचा राग डोक्यात ठेऊन दुसऱ्या दिवशी सुरजने शाळेत येताना दप्तरामध्ये बंदूक आणली होती. शाळेतील पहिले दोन तास झाल्यानंतर मिळालेल्या मधल्या सुट्टीमध्ये सुरजने दप्तरामधील बंदूक काढून आदल्या दिवशी वाद झालेल्या मुलावर दोन गोळ्या झाडल्या.

नक्की वाचा >> अभ्यासावरुन पालक ओरडल्याने १४ वर्षीय मुलाने घरातील दीड लाख चोरले अन् गोवा गाठले; क्लबमध्ये पैसे उडवले पैसे

वर्गामधून बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आल्याने शाळेत एकच गोंधळ उडला आणि सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. या गोंधळाचा फायदा घेऊन आरोपी मुलाने पळून जाणाऱ्याचा प्रयत्न केला. मात्र काही शिक्षकांनी या मुलाला पळण्याच्या प्रयत्नात असतानाच पकडलं आणि थेट पोलिसांच्या स्वाधीन केलं अशी माहिती मुख्यध्यापक असणाऱ्या प्रभात गुप्ता यांनी दिली.

बुंदेलशहरचे सीसीपी असणाऱ्या संतोष कुमार सिंघ यांनी या प्रकरणात पोलिसांनी एक अल्पवयीन मुलाला अटक केली असून त्याच्याकडील हत्यारही ताब्यात घेण्यात आलं आहे. ही बंदूक सुरजच्या काकांची आहे. भारतीय लष्करामध्ये कार्यरत असणारा सुरजचा चुलता सध्या सुट्टीनिमित्त घरी आला असल्याने त्याची बंदूक सुरजला सापडली आणि तोच ती शाळेत घेऊन आल्याचे सांगण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश: पाकिस्तानी महिलेची ग्रामपंचायत प्रमुखपदी निवड; वर्षभरानंतर प्रशासनाला आली जाग

गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं जात असतानाच त्याचा मृत्यू झाला असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ही बंदूक सुरज घरातून कसा घेऊन आला, त्याला यासाठी कोणी मदत केली का? यासारख्या प्रश्नांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. मात्र वर्गात बसण्याच्या जागेवरुन थेट मित्राची हत्या केल्याची घटना घडल्याने या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण शिकरपूरमध्ये आहे.