उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत आहे. युती, मित्रपक्षांसोबत चर्चा सुरु झाल्या आहेत. असं असतानाच दुसरीकडे लोकप्रिय शायर मुनव्वर राणा यांनी मुस्लिमांना भाजपा आणि एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. इतकच नाही तर त्यांनी योगी मुख्यमंत्री झाल्यास उत्तर प्रदेश सोडणार असल्याची घोषणा केलीय. तसेच त्यांनी मुस्लिमांना काही सल्लेही दिले आहेत.

भाजपा आणि ओवैसी हे असे दोन कुस्पीपटू आहेत जे केवळ लोकांना दाखवण्यासाठी एकमेकांविरोधात लढत आहेत. मतांचं ध्रुवीकरण व्हावं आणि त्याचा फायदा भाजपाला व्हावा असं या दोघांचा डाव असल्याचं, मुनव्वर राणा यांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. इतकच नाही तर त्यांनी ओवैसींच्या मदतीने योगी पुन्हा सत्तेत आल्यास राज्य सोडण्याची तयारी केल्याचं सांगितलं आहे. “मुस्लीम ओवैसीकडे गेले आणि निवडणुकीनंतर भाजपाची सरकार येऊन योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी, मुन्नवर राणा उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन,” अशी घोषणाही राणा यांनी मुलाखतीमध्ये केली.

नक्की वाचा >> “…म्हणून मुस्लीम आठ मुलं जन्माला घालतात”; ‘टू चाइल्ड पॉलिसी’वरुन केली टीका

“उत्तर प्रदेश मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य ठिकाण नाही”

उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांच्या परिस्थितीसंदर्भात पुढे बोलताना त्यांनी आता उत्तर प्रदेश मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य ठिकाण नाहीय असं मी मानतो, असंही राणा म्हणालेत. उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांना थोडी सुद्धा अक्कल असेल तर त्यांनी ओवैसींच्या पक्षाला मतदान करु नये, असं राणा म्हणालेत. राणा यांनी मागील काही दिवसांमध्ये दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईनंतर अटक करण्यात आलेल्या अलकायदाच्या दोन दहशतवाद्यांच्या अटकेवरुनही शंका उपस्थित केलीय.

…तर मला पण पकडतील

ज्या दोन मुलांना दहशतवादी म्हणून अटक करण्यात आलीय ते दोघे इतके गरीब आहेत की त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यांना अलकायदाशी संबंधित असल्याचा ठपका ठेवत ताब्यात घेण्यात आलं आहे आणि प्रेशर कुकरला बॉम्ब असं सांगण्यात येत आहे. मी सुद्धा यापूर्वी कार्यक्रमासाठी पाकिस्तानला जायचो. काही दिवसांपूर्वी मी प्रेशर कुकर खरेदी केला आहे. आता दहशतवादी विरोधी पथक मला सुद्धा दहशतवादी आणि तालिबानी समजून उचलून तर घेऊन जाणार नाही ना?, अशी भीती वाटू लागलीय, असा टोलाही त्यांनी मुलाखतीमध्ये लगावला.

सध्या उत्तर प्रदेशमधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि ओवैसींकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात वर वर भांडतात असं सांगत मुस्ली आरोप मुनव्वर राणा यांनी केला आहे. मतांचे ध्रुवीकरण करुन त्याला लाभ भाजपाला मिळवून देण्यासाठी हे दोन्ही पक्ष प्रयत्नशील असतात असा टोलाही मुन्नवर राणा यांनी लगावला आहे. काही दिवसांपूर्वीच ओवैसी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं होतं.