उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. एटीएसने सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे. मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम हे दोघे दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात राहतात. धर्मांतर रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग असून, मूकबधिर मुलं आणि महिलांचं धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून १ हजारांपेक्षा जास्त लोकांचं त्यांनी धर्मांतर केलं असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे.
नोएडातील मूकबधिर शाळेतील मुलांचंही धर्मांतर त्यांनी केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गोमतीनगर पोलीस ठाण्यात राज्यात लागू करण्यात आलेल्या धर्मांतर विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामिक दवाह केंद्राचे अध्यक्षांचाही एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा- Anti Conversion Law: महिलेचं धर्मांतर करणाऱ्या तिघांना अटक
उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की,”या रॅकेटला प्रदेशातून पैसा पुरवला जात असल्याचे पुरावे पोलिसांकडे होते. दोघांनाही चौकशी करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. आम्हाला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. यात परदेशातून पुरवल्या जाणाऱ्या पैशांसंदर्भातील कागदपत्रांचाही समावेश आहे,” असं कुमार यांनी सांगितलं.
हेही वाचा- संपूर्ण देशात लागू होणार धर्मांतर विरोधी कायदा?; केंद्रानं दिलं उत्तर
पोलिसांनी दोघांची चौकशी केली. वर्षभरात २५० ते ३०० मुलांचं धर्मांतर केलं असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांना पैसे आणि नोकरीचं आमिष देऊन हे धर्मांतर करत होते. कल्याणपूर आणि कानपूर येथील दाम्पत्यांच्या मूकबधिर मुलाचं धर्मांतर करण्यात आलं. त्यानंतर त्याला दक्षिण भारतात पाठण्यात आलं. अशी हजारो प्रकरण समोर आली आहेत, असं प्रशांत कुमार म्हणाले.