संसदेचे पावसाळी अधिवेशन पॅगेसस प्रकरण आणि कृषी कायद्यांमुळे चांगलेच गाजत आहे. आज संसद परिसरात अकाली शिरोमणी दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल आणि काँग्रेस खासदार रवनीतसिंग बिट्टू यांच्यामध्ये कृषी कायद्यांवरून शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. हरसिमरत कौर हातात फलक घेऊन संसदेबाहेर कृषी कायद्यांचा विरोध करत होत्या. यावेळी रवनीतसिंग बिट्टू तिथे आले आणि कौर यांनी भाजपासोबत सत्तेत राहून कायदे पारित करवून घेतल्याचा आरोप केला. त्यानंतर हरसिमरत कौरदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले रवनीतसिंग बिट्टू?

रवनीतसिंग बिट्टू यांनी कौर यांच्या आंदोलनाला ड्रामा म्हटलं. तसेच संसदेत कृषी कायदे पारित झाल्यानंतर घरी जाऊन कौर यांनी राजीनामा दिला, तेव्हापर्यंत त्या सत्तेत होत्या अशी टीका केली.

कौर यांचा पलटवार..

“जेव्हा कृषी विधेयकं संसदेत मांडली गेली तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्ष कुठे होता,” असा सवाल कौर यांनी रवनीतसिंग यांना विचारला. तसेच संसदेत या कायद्यांवर चर्चा सुरू असताना काँग्रेस पक्षाने सभात्याग केल्याची आठवण करुन दिली.

कौर यांनी हेमा मालिनींना गव्हाची ओंबी दिली भेट..

दरम्यान, मंगळवारी हेमा मालिनी संसदेत प्रवेश करत असताना हरसिमरत कौर त्यांना गव्हांची ओंबी सोपवली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यास सांगितलं. कौर यांनी हातातील फलक उलटे करून हेमा मालिनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर हेमा मालिनी हसल्या व संसदेत निघून गेल्या होत्या.