प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी याचे निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे सौमित्र चटर्जी यांना लाइफ स्पोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. रविवारी ( १५ नोव्हेंबर) दुपारी १२.१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सौमित्र चटर्जी यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ६ ऑक्टोबर रोजी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचारानंतर त्यांनी करोनावर मात केली होती. मात्र, त्यानंतर कोव्हिड एन्सेफॅलोपॅथी आणि कॉम्पिकेशन्समुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावली. सौमित्र चटर्जी यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कोण आहेत सौमित्र चटर्जी?
सौमित्र चटर्जी हे बंगाली कलाविश्वातील एक नावाजलेलं नाव होतं. त्यांनी १९५९ मध्ये अपुर संसार या चित्रपटाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत त्यांनी जवळपास १४ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. विशेष म्हणजे फ्रान्समधील सर्वात मानाचा Ordre des Arts et des Lettres या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचसोबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आलं होतं. इतकंच नाही तर ३ वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार , ७ फिल्मफेअर व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.