अफगाणिस्तानमधील कंदाहार शहरामधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. अमेरिकेच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचा हा व्हिडीओ आहे. अमेरिकन सैन्याने ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी अफगाणिस्तान सोडल्यानंतरचा हा व्हिडीओ असून धक्कादायक बाब म्हणजे या व्हिडीओत जे हेलिकॉप्टर उडत आहे त्याला खाली रस्सीने एक मृतदेह लटकवला आहे. हा मृतदेह हेलिकॉप्टरला बांधून ते हेलिकॉप्टर तालिबानी कंदाहारवरुन फिरवताना दिसत आहेत.

नक्की वाचा >> पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचं तालिबानला खुलं समर्थन, म्हणाला, “ते जबरदस्त…”

अनेक पत्राकारंनी हा व्हिडीओ शेअर केला असून तालिबान्यांनी या व्यक्तीची निघ्रृणपणे हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरला बांधल्याचं सांगितलं जात आहे. कंदाहार प्रांतावर नजर ठेवण्यासाठी सध्या तालिबान हे हेलिकॉप्टर वापरत असून आपली दहशत कायम ठेवण्यासाठी त्यांनी या हेलिकॉप्टरला मृतदेह बांधून तो शहरावरुन फिरवल्याचं सांगितलं जात आहे.  व्हायरल झालेला व्हिडीओ जमीनीवरुन शूट करण्यात आल्याने रस्सीने बांधण्यात आलेली व्यक्ती जिवंत आहे की नाही हे स्पष्ट पणे दिसत नाही. मात्र अनेक स्थानिक प्रसारमाध्यमांनी तालिबान्यांनी या व्यक्तीची हत्या करुन नंतर मृतदेह हेलिकॉप्टरला बांधून शहरावरुन फिरवल्याचं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “…तर किमान बॉम्ब तरी टाका”; अफगाणिस्तानसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेन प्रशासनाकडे मागणी

अफगाणिस्तानमधील तालिब टाइम्स या तालिबानशीसंबंधित अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. “आपलं हवाई दल! सध्या इस्लामिक अमिरातच्या हवाई दलाचे हेलिकॉप्टर कंदाहार शहरावरुन गस्त घालत आहेत,” अशी कॅप्शन या व्हिडीओ देण्यात आलीय.

द डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेने अफगाणिस्तानला मागील महिन्यामध्ये अशी सात ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर भेट दिली होती. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर आता अफगाणिस्तानमधील अमेरिकन लष्कराच्या तळांवर अनेक विमानं, हेलिकॉप्टर अशाच पद्धतीने पडून आहेत. अमेरिकन सैन्याच्या शेवटच्या तुकडीने अफगाणिस्तान सोडल्यानंतर अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तानमध्ये मागे ठेवलेल्या साहित्यांपैकी ७३ विमानं, २७ हेलिकॉप्टर आणि शस्त्र निकामी केल्याचा दावा केलाय.

नक्की वाचा >> “तालिबान अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाही कारण त्यांना माहितीय, मोदीजी…”

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काबूल विमानतलावरील अमेरिकन हवाईतळाचा भाग असणाऱ्या प्रदेशात तालिबान्यांनी प्रवेश केला. त्यांनी तेथील चिनुक हेलिकॉप्टर तपासली आणि त्याचप्रमाणे अमेरिकन सैनिक काय काय मागे सोडून गेलेत याची पहाणी केली. दरम्यान, अमेरिकन लष्करातील जनरल केंथ मॅकन्झी यांनी संपूर्ण सैन्य मागे घेतल्याची घोषणा सोमवारी केली. केंथ मॅकन्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी (अमेरिकन वेळेप्रमाणे) अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तानमधून उड्डाण केलं. “अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य पूर्णपणे मागे घेण्यात आल्याची मी घोषणा करतो. अमेरिकन नागरिक आणि अफगाणिस्तानी लोकांना वाचवण्यासाठी अमेरिकन लष्कराने सुरु केलेलं मदतकार्य पूर्ण झालं आहे. अमेरिकेच्या शेवटच्या सी -१७ विमान हे हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी उड्डाण केलं आहे.” असं मॅकन्झी म्हणालेत.

तसेच लष्करी मदकार्य संपलं असलं तरी राजनैतिक पद्धतीने अमेरिकन आणि अफगाणी नागरिकांना मदत करणं आम्ही सुरुच ठेवणार असल्याचं मेकन्झी यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी “अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडल्याच्या बातमीनंतर पहिली प्रतिक्रिया दिलीय. “अफगाणिस्तानमध्ये मागील २० वर्षांपासून असणारी आमच्या सैन्याची उपस्थिती संपुष्टात आलीय. यासाठी मी आमच्या लष्कराच्या कमांडर्सचे आभार मानू इच्छितो की त्यांनी इतक्या धोकादायक वातावरणामध्ये अफगाणिस्तानमधून नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ३१ ऑगस्टच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये संपूर्ण लष्कर मागे घेतलं आणि त्यात अमेरिकन नागरिकांना प्राण गमावावे लागले नाहीत,” असं म्हटलं आहे.

अमेरिकचे संरक्षण विभागाने ही अफगाणिस्तान सोडणाऱ्या अमेरिकन लष्कराच्या शेवटच्या कमांडरचा फोटो ट्विट केलाय. मेजर जनरल क्रिस डोन्ह्यू हे ३० ऑगस्ट रोजी सी-१७ विमानामध्ये चढणारे आणि अफगाणिस्तान सोडणारे शेवटचे अमेरिकन लष्करी अधिकारी ठरले. यासोबतच अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील मोहीम संपुष्टात आलीय असं या फोटोसहीत दिलेल्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे.

बायडेन यांनी मागील १७ दिवसांमध्ये अमेरिकन लष्कराने अमेरिकन ऐतिहासामधील सर्वाधिक संख्येने म्हणजेच १ लाख २० हजार अमेरिकन नागरिक, अफगाणिस्तानमधील सहकारी आणि इतरांना एअरलिफ्ट केलं असल्याची माहिती दिली.