रविवारी राजधानी काबूल ताब्यात घेत अफगाणिस्तावर तालिबानने जवळजवळ संपूर्ण कब्जा केला. अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परतण्याची मुदत जवळ येऊ  लागताच सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनी अवघ्या आठवडाभरातच जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, तालिबान लवकरच काबूल येथील अध्यक्षीय प्रासादातून अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर करणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तालिबान राजवटीची झलक दाखवणारे धक्कादायक चित्र रविवारी काबूलमध्ये पहायला मिळालं. काबूलमधील मुख्य तुरुंग तालिबान्यांनी फोडलं आणि हजारो दहशतवाद्यांनी तुरुंगातून पलायन केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल नेटवर्कींगवर व्हायरल होतं आहे.

नक्की पाहा >> Video: काबूल विमानतळावर हजारो नागरिकांची गर्दी, देश सोडण्यासाठी धडपड; रात्रभर ऐकू येत होते गोळीबाराचे आवाज

काबूलच्या तुरुंगातील हजारो कौद्यांना तालिबानने मुक्त केलं आहे. यामध्ये ‘इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया'(आयएसआयएस) आणि ‘अल-कायदा’च्या दहशतवाद्यांना सोडून दिलं. या दहशतवादी संघटनेशीसंबंधित दहशतवाद्यांचा समावेश आहे. तालिबानने हे शांततापूर्ण सत्तांतरणादरम्यान घडल्याचं म्हटलं आहे. रविवारी अफगाणिस्तान सरकारने बाग्राम एअरबेस तालिबानच्या ताब्यात दिला. या ठिकाणी पुल-ए-चाकरी तुरुंग आहे. या तुरुंगात पाच हजार कैदी आहेत. तालिबानने यावर ताबा मिळवल्यानंतर सर्व कैद्यांना सोडून दिलं आहे. तुरुंगात सर्वाधिक कैदी हे अलकायदा आणि तालिबानी दहशतवादी होते. अफगाण न्यूज एजन्सीने दाखवलेल्या फुटेजमध्ये तालिबानी दहशतवादी कैद्यांना सोडून देत असल्याचं दिसत आहे. तुरुंगामधून गोळीबाराचे आवाज आल्याचंही बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एनबीसी न्यूजचे परराष्ट्र वृत्तांकनाचे प्रमुख रिचर्ड एन्जल यांनी तुरुंगातून बाहेर पडणाऱ्या कैद्यांचा व्हिडीओ ट्विट केलाय.

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही.  महिलांचे अधिकार हिरावून तालिबान पूर्वीप्रमाणे अमानुष राजवट सुरू करील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने नागरिकांना संरक्षणाची हमी देऊनही पूर्वानुभवामुळे भयभीत नागरिक आणि परदेशी दूतावासांतील कर्मचाऱ्यांनी देशाबाहेर पडण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर अफगाणी सुरक्षा दलांनी पाश्चिमात्य देशांच्या लष्करांसाठी मोकळा केला आहे, असे एका वैमानिकाने सांगितले. तालिबानी बंडखोरांनी काबूल शहराच्या सीमांवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्या भागांमध्ये अधूनमधून गोळीबाराचे आवाज येत होते, परंतु शहराला जोडणारे बहुतांश रस्ते शांत होते. कर्मचारी सरकारी कार्यालये सोडून निघून गेले आहेत. राजदूतावासांमधील कर्मचाऱ्यांनी मात्र संवेदनशील कागदपत्रे जाळून टाकल्याने धुराचे लोट शहरावर दिसत होते. तसेच तालिबान्यांनी काबूलचे मुख्य तुरुंग फोडून अनेक कैद्यांना मुक्त केलं.

नक्की वाचा >> “…अन् त्यांनी देश विकला”; देशातून पलायन केलेल्या अफगाणी राष्ट्राध्यक्षांवर संरक्षण मंत्र्यांचे गंभीर आरोप

अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊ न सत्तेचे ‘शांततापूर्ण हस्तांतर’ करावे असे आवाहन तालिबानी बंडखोरांनी केले आहे. ‘‘काबूल शहराचे शांततेत हस्तांतर व्हावे याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत’’, असे तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने कतारमधील अल-जझीरा वृत्तवाहिनीला सांगितले. मात्र आपली सैन्यदले आणि सरकार यांच्यातील संभाव्य वाटाघाटींचे तपशील सांगण्यास त्याने नकार दिला. तालिबानला कशा प्रकारचा करार हवा आहे असे विचारले असता, सरकारने विनाशर्त शरणागती पत्करावी, अशी आपली अपेक्षा असल्याचे तो म्हणाला.