उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, अजब प्रकारे एक गुन्हा नुकताच दाखल करण्यात आला आहे. बर्थडे पार्टीवरुन एका हिंदू मुलीसोबत घरी परतत असलेल्या मुस्लिम तरुणावर पोलिसांनी धर्मांतरविरोधी कायदा, अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तरुणीचं वय १६ वर्षे आहे.

संबंधित तरुणीने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं, “मी न्यायधीशांना सांगितलं की, त्या लोकांना आम्ही मित्रांसोबत चालतानाही अडचण होत आहे. मी पुन्हा पुन्हा हेच म्हणेन. माझ्या वर्गमित्रासोबत मी घरी निघालेले असताना त्यांनी याचं चित्रिकरण केलं आणि त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणत होते. मी माझ्या मर्जीने माझ्या मुस्लिम मित्रासोबत घरी निघाले होते, माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता.”

आणखी वाचा- मैत्रिणीसोबत घरी परतणाऱ्या मुस्लिम युवकाविरोधात ‘लव्ह जिहाद’ कायद्यांतर्गत गुन्हा

दरम्यान, १४ डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता हा प्रकार घडला होता. एक हिंदू दलित तरुणी आपल्या जुन्या मुस्लिम वर्गमित्रासोबत बर्थडे पार्टीनंतर घरी परतत होती. रस्त्त्यात एका टोळक्यानं त्यांचा पाठलाग केला आणि दांडक्याने मुलाला मारहाण केली. जेव्हा त्यांना कळलं की मुलगा मुस्लिम धर्मीय आहे तर ते त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यानंतर मुलावर धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत, अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याला आठवडाभर पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं.

दरम्यान, बिजनौर पोलिसांनी दावा केला आहे की मुलीला मुलाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला पण तिची मुलाच्या तावडीतून सुटका करण्यात यश आले आहे.

Story img Loader