संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाला लगाम लावत जोरदार प्रदर्शन केलं आहे. बहुमतासाठी १४७ जागा आवश्यक असलेल्या विधानसभा निवडणुकीत ममतांच्या तृणमूल काँग्रेसनं जोरदार मसुंडी मारली आहे. तृणमूलने केलेल्या कामगिरीवर ‘जबरदस्त विजय’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ममतांचं अभिनंदन केलं आहे.

करोना संकटात प्रचंड वादळी आणि संघर्षपूर्ण ठरलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं भाजपाला शंभरीच्या आत रोखले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळाला पाचारण करत भाजपाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत संपूर्ण शक्ती पणाला लावला होता. मात्र, तरीही भाजपाला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. अंतिम निकाल येणं अद्याप बाकी असले, तरी निकालाचं एकूण चित्र स्पष्ट झालं आहे. तृणमूल काँग्रेस दणदणीत विजय मिळवताना दिसत आहे.

आणखी वाचा- Assembly Election Results 2021: भाजपा विरोधकांचा ममता दीदींवर कौतुकाचा वर्षाव

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. “जबरदस्त विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन. चला आता लोकांच्या कल्याणासाठी आणि करोना महामारीविरुद्ध लढा देण्याचं काम एकजुटीने करू,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आधीपासूनच तयारी सुरू केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बंगालवर विशेष लक्ष केंद्रीत केलं होतं. निवडणूक प्रचारातही भाजपाने पूर्ण ताकद पणाला लावल्याचं दिसून आलं. मात्र, अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकलं नाही. तृणमूल काँग्रेसनं भाजपाला जबर टक्कर देत धोबीपछाड दिला.