करोना उत्परिवर्तनांच्या धोक्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जीनिव्हा : जगातील ८० टक्के व्यक्तींचे लसीकरण झाले तरच विषाणूच्या नवीन उपप्रकारांपासून  निर्माण होणारा धोका टळेल, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे. नवीन विषाणूंमुळे काही प्रमाणात ठिकठिकाणी साथ पसरत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन प्रमुख डॉ. मायकेल रायन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, करोना साथीतून बाहेर पडण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर लसीकरण हा उपाय आहे. अनेक श्रीमंत देशात प्रौढ व मुले यांचे लसीकरण चालू आहे. त्यांना नवीन विषाणू प्रकारांची लागण होण्याचा धोका लसीकरणामुळे कमी होत आहे पण हेच देश गरीब देशांना मात्र लस द्यायला तयार नाहीत. त्यामुळे तेथे धोका कायम आहे.

ब्रिटनने मोठय़ा प्रमाणात लसीकरण केले असून त्यामुळे रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण असे असले तरी डेल्टा विषाणूंचा प्रसार वाढत आहे. हा विषाणू मूळ भारतातला आहे. नेमके किती प्रमाणात लसीकरण गरजेचे आहे हे सांगता येणार नाही. सर्वांचेच लसीकरण करणे हितावह आहे पण निदान ८० टक्के लोकांचे तरी लसीकरण झाले पाहिजे. त्यामुळे इतर देशांतून येणाऱ्या विषाणूंपासून निर्माण होणारा धोका कमी होईल, असे  ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या तंत्रज्ञान प्रमुख मारिया व्हॅन खेरखोव यांनी सांगितले की, डेल्टा विषाणू साठ देशांत पसरला असून तो ब्रिटनमध्ये सापडलेल्या अल्फा विषाणूपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. सामाजिक पातळीवर एकत्र येणे, सार्वजनिक आरोग्य  यंत्रणेतील शिथिलता, लशीचे असमान वितरण या गोष्टी विषाणू्च्या प्रसारास कारण ठरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस ट्रेडॉस घेब्रेसस यांनी म्हटले आहे की, जी ७ देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या लसीकरण कार्यक्रमात मदत करू व विकसनशील देशांना लशींचा पुरवठा वाढवावा.